ठाण्यात मत चोरी
काँग्रेसची निवडणूक आयोगावर झोड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : काँग्रेसचे नेते राहुल गांधी मत चोरीसाठी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्यासकट समोर आणले आहे; परंतु निवडणूक आयोग सतत डोळेझाक करून सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. ठाण्यातील घटना त्याचे ठोस पुरावे देणारी असल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना कर्मचारीवर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्रे व पॅन कार्ड मिळाली. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष नीलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरात धाव घेतली. त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो, व्हिडिओ काढले आणि यातील काही मतदान कार्डांवरील पत्त्यांची चौकशी केली असता, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही ओळखपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी (ता. २९) ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे १४९ विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपुर्त केली. यावर राहुल पिंगळे यांनी प्रचंड संताप व्यक्त करीत निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला.
ते म्हणाले, की ही बोगस ओळखपत्रे नेमकी कशी तयार झाली, याचा उपयोग नेमक्या कोणत्या निवडणुकांमध्ये झाला, या सर्व बाबींचा सखोल तपास झाला पाहिजे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर थेट आघात असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा लोकशाही ही केवळ नावापुरती राहील.
या शिष्टमंडळात नीलेश पाटील, मोतीराम भगत, वसीम सय्यद, यासीन मोमिन, रवींद्र कोळी, नुर्शिद शेख, हमीद शेख, रमेश सोनवणे, रोशन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.
ओळखपत्रे २०१५ सालातील
मंदारमाला अपार्टमेंट, अभयनगर झोपडपट्टी, कळवा या पत्त्यावर परब नावाचे गृहस्थ मागील २० वर्षांपासून राहत आहेत. मात्र सापडलेल्या ओळखपत्रावरील पत्ता हाच असल्याचे दिसते. सर्व ओळखपत्रांचे व्हेरिफिकेशन होणे अत्यावश्यक आहे. जमा करण्यात आलेली बहुतेक ओळखपत्रे २०१५ सालातील असून काही २०१६ व २०१७ सालातील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.