श्रद्धांजली - प्रिया मराठे
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रिया आणि माझी ओळख झाली आणि त्यानंतर ती एक घट्ट मैत्रीत परावर्तित झाली. कामाच्या निमित्ताने तसेच वैयक्तिक आयुष्यातही आम्ही अनेक क्षण एकत्र घालवले. कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते अखेरपर्यंत तिचा संपूर्ण प्रवास मी जवळून अनुभवला आहे. ती अतिशय जिद्दीने, धैर्याने लढली. मी एका उत्तम कलाकाराला, एका उत्तम व्यक्तीला आणि माझ्या प्रिय मैत्रिणीला गमावलं आहे. अजूनही मला हे वास्तव वाटत नाही. ती नेहमी हसतमुख असायची. आज तिच्या जाण्याचं फार दुःख झालं आहे.
- अभिजित खांडकेकर, अभिनेता
प्रिया एक अभिनेत्री म्हणून किती गुणी आहे हे सांगण्याची गरज नाही. कारण प्रेक्षकांनी तिला त्याची पोचपावती दिली आहे; पण तिच्या व्यक्तिमत्त्वातील खरी मोहकता तिच्या स्वभावात होती. ती खूप गुणी, खोडकर, मोकळीढाकळी आणि मस्तीखोर होती. मिळून-मिसळून राहणं हा तिचा स्वभाव होता. सुमारे १७-१८ वर्षांपासून ती या इंडस्ट्रीत कार्यरत होती; पण तिच्याबद्दल कधीही कुणाकडून वाईट ऐकायला आलं नाही. मी तिच्यासोबत ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘तिला काही सांगायचंय’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. ती माझी जिवाभावाची मैत्रीण होती.
- आस्ताद काळे, अभिनेता
प्रियासोबत मी काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे; मात्र मालिकांमध्ये आमचे फारसे एकत्र सीन नव्हते. नाटकाच्या बाबतीतही मी नाटक सोडल्यानंतर तिने एन्ट्री केली. त्यामुळे आमचा संवाद कमी झाला. ती एक अत्यंत गुणी अभिनेत्री होती. तिच्या निधनाची बातमी ऐकून मला फार दुःख झालं.
- अभिजित केळकर, अभिनेता
प्रिया ही एक खूप चांगली आणि सक्षम अभिनेत्री होती. तिच्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चांगल्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. तिच्या निधनाची बातमी ऐकून मला अतिशय वाईट वाटलं. तिच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.
- वनिता खरात, अभिनेत्री
प्रियाबरोबर काम करण्याचा योग कधी आला नाही; परंतु अभिजित खांडकेकर आणि अभिजित गुरू असे आम्ही सगळे एकत्र जमायचो आणि आमच्यामध्ये छान गप्पा व्हायच्या. इतक्या कमी वयात ती आपल्याला सोडून जाईल, असे काही वाटले नव्हते. तिचा स्वभाव मनमिळावू आणि गोड होता. माझी गोड मैत्रीण हरपली.
- समीधा गुरू, अभिनेत्री
मी प्रियाबरोबर एक गाणे केले होते. एक व्यक्ती म्हणून ती चांगलीच होती आणि अभिनेत्री म्हणून छान होती. ती सगळ्यांशी चांगलेच वागायची. आम्ही लवकरच काही प्रोजेक्ट करणार होतो. त्याबाबतीत आमच्यामध्ये चर्चा सुरू होती; परंतु आता ते होणे नाही.
- सुयश टिळक, अभिनेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.