गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत रोषणाई
मनाई आदेश धुडकावून बेकायदा कृत्य; प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास स्पष्ट मनाई केली असतानाही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून या आदेशाला धुडकावले आहे. शहरातील अनेक झाडांवर मोठ्या प्रमाणावर रोषणाई करण्यात आलेली आहे. या मंडळांविरोधात अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे, तर या पार्श्वभूमीवर उद्यान विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी सांगितले की, विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, झाडांवर विद्युत दिव्यांची सजावट ही केवळ प्रकाश प्रदूषण निर्माण करणारी घटना नसून त्याने पक्षी, कीटक आणि झाडांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका पोहोचतो. यासंदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही उपहारगृहे आणि व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या दुकानांसमोरील झाडांवर रोषणाई केली होती. त्या वेळी प्रशासनाने नोटीस देऊन काही ठिकाणी गुन्हे नोंदवले होते. गणेशोत्सव आणि नवरात्र काळात झाडांवर रोषणाई करण्याची प्रथा अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेने सर्व वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना कडक सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, परंतु वास्तवात या सूचनांकडे मंडळांनी तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.
...........................
नियमांची पायमल्ली
सध्या सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली आणि दिघा या विभागातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या आजूबाजूच्या झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सवाला पाच दिवस उलटून गेले तरीही या रोषणाईवर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे दुर्लक्ष प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी घालण्यात आलेले नियम पाळणे बंधनकारक असतानाही गणेशोत्सव मंडळांनी या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे आता उशिराने का होईना, परंतु महापालिकेने कठोर कारवाई करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.