सार्वजनिक गणेशोत्सवाचा आदर्श ठरलेले रोहे गाव
१०४ वर्षांची अखंड परंपरा; एक गाव, एक गणेशोत्सवाची परंपरा कायम
रोहा, ता. २ (बातमीदार) : कुंडलिका नदीच्या तीरावर व डोंगररांगांच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य रोहे गाव आज महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आदर्श गावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एक गाव, एक गणेशोत्सव, ही संकल्पना आज राज्यभर प्रसिद्ध झाली असली तरी रोहे गावाने १०४ वर्षांपूर्वी या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजात एकात्मता निर्माण करण्याचा, देशप्रेम जागृत करण्याचा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्याचा हेतू ठेवला. त्याच प्रेरणेने कै. पू. कृ. जोशी (दादा जोशी मास्तर) यांच्या पुढाकाराने आणि रोहेकरांच्या सहकार्याने १९०२ मध्ये रोह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्या वेळी दानशूर व्यक्ती कै. आबासाहेब मेहेंदळे यांनी आपल्या मालकीचे श्री दुर्गादेवी मंदिर, टेबल, खुर्च्या, सतरंज्या आणि दिवाबत्ती देऊन उत्सवाला खंबीर पाठिंबा दिला. सुरुवातीला हा उत्सव पाच दिवसांचा असला तरी नंतर तो १० दिवसांचा झाला. या उत्सवातून स्वदेशी व स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार झाला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने अनेक बंधने लादली आणि इतर कारणांमुळे १९१२ मध्ये उत्सव बंद झाला, मात्र १९२१ मध्ये कै. द. वि. गांगल यांच्या प्रयत्नांमुळे हा उत्सव पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आजपर्यंत अखंड चालत आलेली ही परंपरा आज १०४ वर्षे पूर्ण करत आहे.
................
या कालावधीत भाटे वाचनालय हे या उत्सवाचे मुख्य केंद्र राहिले. रोहेकरांचा आत्मीयतेने सहभाग असल्याने उत्सव खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून गेला. १९८० नंतर तरुणाईच्या सहभागामुळे उत्सव अधिक भव्य झाला. स्वर्गीय दिलीपभाई राजे, दिलीप वडके, विजय देसाई, अविनाश दाते, गिरीश पेंडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्सवाला नवे आयाम दिले. आजही अनेक तरुण या उत्सवातून नेतृत्वाची प्रेरणा घेतात.
....................
‘पाणी हरवलं’ - जागृती करणारा उपक्रम
यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे ‘पाणी हरवलं’ या शीर्षकाखाली चलचित्राच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश दिला जात आहे. रोज शेकडो गणेशभक्त श्री गणरायाचे दर्शन घेत असताना या चलचित्रालाही मोठी गर्दी होत आहे. पाणी ही जीवनाची खरी शिदोरी आहे आणि त्याचे जतन करणे काळाची गरज आहे, हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.