चंद्रसागर खाडीत चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन
पक्षीनिरीक्षकांसाठी खास आकर्षण; भराव टाकल्यानंतर नैसर्गिक वातावरण
कासा, ता.०२ (बातमीदार) : डहाणूच्या चंद्रसागर खाडीत तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा चित्रबलाक किंवा चामढोक (पेंटेड स्टॉर्क) हे देखणे करकोचा जातीचे पक्षी विहार करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे पक्षी खाडीत मुक्तपणे विहार करत असल्याचे दृश्य स्थानिक नागरिक आणि पक्षीनिरीक्षकांसाठी आनंदाची बातमी ठरले आहे.
काही वर्षांपूर्वी खाडीत बेकायदा भराव टाकल्यामुळे पाणथळ पक्ष्यांनी या परिसराला पाठ फिरवली होती. कांदळवनाचा नाश होऊन जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला होता. यावर सजग नागरिक संगीता कडू यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश देत दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या मदतीने खाडी भरावमुक्त करण्यात आली.
उच्च न्यायालयाने रिट याचिका निकाली काढताना सीआरझेडचे उल्लंघन करून भराव टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच सहा आठवड्यांत खाडी पूर्ववत करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जून-जुलै महिन्यात नऊ ठिकाणी बांध फोडून खाडीला पुन्हा श्वास घेण्याची संधी मिळाली. भराव हटवल्यानंतर खाडीतील पाणीप्रवाह आणि नैसर्गिक वातावरणाला नवा जीव मिळाला. याच पोषक वातावरणामुळेच स्थलांतरित चित्रबलाक पक्ष्यांनी पुन्हा येथे येण्याचा मार्ग धरला आहे. इतर पक्ष्यांच्या जातीही येथे दिसण्याची शक्यता असून, हे पक्षीनिरीक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
चौकट
पक्षीप्रेमींकडुन आनंद व्यक्त
डहाणू परिसरातील स्थानिक नागरिक, हौशी पर्यटक तसेच पक्षीप्रेमींनी या पक्ष्यांचे थेट दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. वाइल्डकेअर स्वयंसेवक सागर पटेल आणि छायाचित्रकार समीर भालेरकर यांनी या दुर्मिळ क्षणांची छायाचित्रे टिपली आहेत. याबाबतीत वाईल्ड लाईफचे सदस्य हार्दिक सोनी यांनी सांगितले की गेल्या आठ-दहा दिवसापासून डहाणू चंद्र सागर खाडी परिसरात हे पक्षी पाहायला मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.