हिरवा चारा ठरतोय उदरनिर्वाहाचा आधार
कासा बातमीदार महेंद्र पवार)
कासा, ता. ४ : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या शेतकरी व आदिवासी कुटुंबांसाठी हिरव्या चाऱ्याने जगण्याचा आधार मिळवून दिला आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्या, पडीक माळरान, जंगल परिसरात मुबलक प्रमाणात हिरवा चारा उगवतो आहे. मिळेल त्या साधनांनी हा चारा कापून आदिवासी कुटुंबे पहाटेच्या सुरुवातीपासून चारा बांधून महामार्गालगत ठरावीक ठिकाणी विक्रीस ठेवत आहेत. गाई-म्हशी पाळणारे दूध उत्पादक, डेअरी चालक या ताज्या कल्पाळ चाऱ्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असून, त्यातून आदिवासी कुटुंबांचा संसार सुरू आहे.
आज अनेक शहरी भागांमध्ये हायब्रीड चाऱ्याची लागवड केली जात असली तरी ताजा नैसर्गिक हिरवा चारा अधिक पौष्टिक आणि किफायतशीर असल्याने त्याला शहरातून मोठी मागणी आहे. जंगल किंवा मोकळ्या जमीन भागातून कापलेला चारा ट्रॅक्टर, पिकअप, ट्रकद्वारे व्यापाऱ्यांकडून थेट शहरात जातो. प्रत्येक भाऱ्यास सुमारे ५० रुपये मिळतात. काही जण तर किलोच्या भावाने या चाऱ्याची विक्री करतात. दिवसाला ३५० ते ४५० रुपये उत्पन्न मिळत असल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य झाले आहे.
मेंढवण, मनोर, आवढणी, तलासरी, ओसरविरा येथील महामार्गालगत सकाळी हिरव्या चाऱ्याचे ढीग आणि ते घेण्यासाठी येणारी वाहने हे रोजचे दृश्य झाले आहे. सध्या चाऱ्याचे क्षेत्र भरपूर असले तरी जमिनींच्या खरेदी-विक्रीतून अनेक माळराने कुंपणामुळे बंद झाल्याने ही नैसर्गिक संपत्ती निश्चितच कमी होत चालली आहे. दुसरीकडे गावाकडील पशुपालनही घटत असल्याने ग्रामीण चारा थेट शहरांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
चारा कापणारे मजदूर गणपत वावरे सांगतात, ‘‘आम्ही मागच्या एक महिन्यापासून गवत कापत आहोत. पहाटे उठून जंगलात जावे लागते. साप, विंचू यांचा धोका असतो, पण पोटासाठी तेवढं करावंच लागतं. दिवसाला चारशे-पाचशे रुपयांचे चाऱ्याचे भारे विकतो. अजून महिनाभर हा रोजगार चालेल.’’
ताज्या हिरव्या चाऱ्यातून मिळणारे छोटेसे उत्पन्न उघड्या आकाशाखाली जगणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी सध्या दिलासा ठरत आहे. परंतु पुढे पावसाने किंवा जमिनींवर कुंपण वाढल्याने हा चारा कमी झाला तर त्यांच्यापुढे पुन्हा बेरोजगारी येऊन उभी राहील. गावातील हिरवा चारा त्यांना जरी दोन वेळच्या भाकरीची सोय करून देत असला तरी उद्या त्यांच्या डोळ्यांत पुन्हा अंधार दाटू नये, ही अपेक्षा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.