गणराया सुबुद्धी दे, गुरुजींना थोडा शिकवायला वेळ दे!
शाळेच्या बसवर शिक्षकदिनानिमित्त फलक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ‘विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांना मुलांना पूर्णवेळ शिकवण्यासाठी वेळ देता येईल, यासाठी नियंत्रक प्रमुखांना सुबुद्धी दे, शिक्षकांवर लादलेली कामे कशी कमी होतील, यासाठी नियंत्रक प्रमुखांच्या कानात समजुतीच्या दोन गोष्टी तू सांग,’ असा फलक येथील उपक्रमशील विद्यानिकेतन शाळेने आपल्या शाळेच्या बसवर लावला आहे.
मागील काही वर्षांपासून राज्य, स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचे चित्रण, सामान्य माणसांच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळा करीत आहे. या माध्यमातून शहरातील नागरिक, विद्यार्थी, पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५ सप्टेंबरला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय. या दिवशी राज्यभर शिक्षकदिन साजरा केला जातो. शिक्षकांचे सत्कार सोहळे, तोंडभरून कौतुक केले जाते; पण एकदा शिक्षकांच्या कौतुकाचा कार्यक्रम संपला की तोच शिक्षक पुन्हा मुलांना शाळेत शिकवायचे आहे, असा फक्त विचार करून मतदानाच्या चिठ्ठ्या वाटप करतो आहे.
गावातील शेळ्या, मेंढ्या, शौचालये मोजायची आहेत. जणगणना, घराघरात आधार कार्ड आहेत की नाही याची तपासणी, महासाथ आली की औषध गोळ्यावाटप करायची आहेत. पेपर तपासणी, घोषित उपक्रम राबवायचे आहेत, या विचाराने विनम्रपणे आपल्या कामासाठी शाळेच्या आवारातून बाहेर पडतो. या सर्व वेळखाऊ शिक्षणाशी दुरान्वये संबंध नसलेल्या कामातून मुक्तता करण्याचे काम गणराया तूच कर. न्यायालयाने आदेश देऊन झालेत. शिक्षक संघटनांनी पत्रे देऊन झाली आहेत. शिक्षक संघटनेची बांधिलकी आता राजकीय पक्षांशी आहे. कोणी कोणाचे ऐकण्यास तयार नाही, गणराया तू शाळाबाह्य कामातून गुरुजी लोकांची मुक्तता कर आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, घडविण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल, असे काहीतर कर, अशी प्रार्थना या फलकाच्या माध्यमातून गणरायाला केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.