गणेशोत्सवात लोणेरे सेक्शन विभागाचा अखंडित वीजपुरवठा
नागरिकांकडून समाधान व्यक्त; कर्मचारीवर्गाच्या पराक्रमाचे कौतुक
माणगाव, ता. ११ (बातमीदार) : गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि ऐक्याचा सण मानला जातो. या सणात घराघरांत आणि मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते. त्यामुळे संपूर्ण उत्सवाची शोभा टिकून राहावी, यासाठी अखंडित वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. यंदाच्या गणेशोत्सवात लोणेरे सेक्शन विभागाने नागरिकांना दिलेला सुरळीत व अखंड वीजपुरवठा सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या उत्सव काळात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या लोणेरे विभागाने विशेष नियोजन करून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. कोणताही अडथळा किंवा खंड न पडता झालेल्या या व्यवस्थेमुळे गावोगावी समाधानाची भावना व्यक्त होत आहे. उत्सव काळात आलेल्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांनीही विजेच्या अखंडित सेवेसाठी समाधान व्यक्त केले. सणासुदीच्या काळात विजेची कोणतीही अडचण आली नाही, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे, अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली. या कार्यासाठी सहाय्यक अभियंता योगेश बढीया यांच्या मार्गदर्शनाखाली लाइनमन केशव जांबरे, वायरमन सुरेंद्र शिर्के, तसेच हार्षद सालदूर, सोमेश्वर काळस्पेपे, संकेत अंधेरे, भावेश धोंडगे, वृषभ पवार, प्रसाद धाडवे यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. कुठलीही अडचण उद्भवल्यास तातडीने ती सोडवण्यासाठी सर्वांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याचे नागरिक सांगतात. लोणेरे विभागातील या तत्परतेमुळे वीज विभागावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मेहनतींच्या घामाने उजळलेला हा उत्सव कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची साक्ष देतो. नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, आगामी काळातही अशीच अखंडित वीजसेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.