उरण, ता. ८ (वार्ताहर)ः कधीकाळी मुंबई विभागात अव्वल असणाऱ्या उरण एसटी आगाराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. आगारातील जुन्या बसमधून करावा लागणारा प्रवास तसेच अपुऱ्या संख्येमुळे तासनतास ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवली आहे.
उरणची वाहतूक व्यवस्था काही वर्षांपूर्वी स्थिर होती. उरण शहर एसटीमुळे पनवेल, नवी मुंबई, मुंबईशी जोडले गेले. कधीकाळी उरणमधील प्रवाशांची एसटीही जीवनवाहिनी होती. कालांतराने उरणचा विकास झाल्याने नवी मुंबईतून उरणकडे येणारी एनएमटीबरोबर रेल्वेसेवा सुरू झाली. काळाप्रमाणे उरण एसटी आगारात कोणतेही बदल झालेले नाहीत. आगारांमधील शौचालय, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच जुन्या एसटी खिळखिळ्या झाल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे खासगी तसेच आरामदायी वाहतुकीकडे कल वाढला असून, जास्त भाडे मोजूनही प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
---------------------
प्रवासासाठीच महत्त्वाचा दुवा
उरण, पनवेलच्या ग्रामीण विभागात सेवा पुरविली जाते. ग्रामीण भागातील सेवेतून उरण एसटीला चांगले उत्पन्नही मिळते. या आगारातून पनवेल, जुईनगर, चिरनेर, आवरे, पेण, अलिबाग येथे प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे उत्पन्नात चांगले मिळत होते. तसेच आगारातून तालुक्याच्या ग्रामीण भागासह मुंबईतील दादर, ठाणे, शिर्डी, अक्कलकोट, कराड, मालेगाव अशा लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूकही सातत्याने सुरू आहे.
ृ----------------------------------
प्रवासात विविध विघ्ने
- उरण-पनवेल मार्गावरून सर्वात जास्त फेऱ्या होत आहेत. पनवेल येथे उरणकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी साधी बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना तासनतास उन्हात, पावसात ताटकळत उभे रहावे लागत आहे.
- प्रवासादरम्यान उरण-पनवेल, उरण-पेण, उरण-अलिबाग, कर्जत, मोहपाडा, आवरे, चिरनेर प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यातून प्रवास करताना अपघाताची भीती निर्माण होत आहे. या मार्गांवर वाहतूक मंदावल्याने कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
--------------------------------------
प्रवासी घटण्याची कारणे
- उरण परिसरात लोकसंख्येत वाढ झाल्याने प्रवासीसंख्येत वाढ झाली, मात्र उरण आगाराने वर्षानुवर्षे नादुरुस्त एसटीच सुरू ठेवल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. बसच्या संख्येतही वाढ केली नाही. उलट भाड्यामध्ये वाढ केल्याने प्रवाशांच्या संख्येत घट झाली.
- सध्याची जीवनशैली अधिक गतिमान झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला इच्छित स्थळी वेळेवर पोहोचायचे असते, मात्र उरणमधून धावणाऱ्या एसटीत अद्ययावतीपणा आलेला नाही. नादुरुस्त बसमुळे फेऱ्या कमी झाल्या आहेत. इतर वाहतुकीपेक्षा दर ही जास्त असल्याने प्रवासीसंख्येत घट झाली आहे.
---------------------------------------
बससंख्या- ४८
चालक - ९२
वाहक - ७२
-------------------------------
उत्पनाला उतरती कळा
गेल्या वर्षी दिवसाला २७४ बसच्या फेऱ्या मारूनही उरण एसटी आगाराला दिवसाला साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले होते, मात्र ते उत्पन्न आता घटले असून, पावणेदोन लाखांवर आले आहे.
---------------------------
उरणमध्ये एनएमएमटीची सेवा सुरू झाली. तिकीटदर कमी असून, प्रवास थंडगार झाला आहे. रेल्वे धावत असून, त्याचे दर कमी आहेत. अशातच अनेक मार्गांवरील खड्ड्यांमुळे एक तासाच्या प्रवासाला दोन तास लागतात. आम्ही सुविधा देत आहोत, परंतु विविध कारणांमुळे प्रवासी कमी झाले आहेत. उत्पन्नवाढीसाठी बाहेरगावी जाणारी ठिकाणे वाढवली आहेत.
- अमोल दराडे, उपसहाय्यक आगारप्रमुख, उरण
----------------------
उरणकरांसाठी एसटी जीवनवाहिनी होती, मात्र काळानुसार आगाराने सेवेत बदल केला नाही. नादुरुस्त गाड्यांचा वापर होत असल्याने प्रवासासाठी फेऱ्या वाढवल्या, तर प्रवासी एसटीने प्रवास करतील. त्यासाठी एसटीच्या संख्या वाढवणे गरजेजे आहे.
- संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते, उरण सामाजिक संस्था सरचिटणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.