खोपोली-खालापुरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग
मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ, खर्चवाढीमुळे तारेवरची कसरत
खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः गणपती उत्सवाचा उत्साह संपताच खोपोली व खालापूर परिसर आता नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगू लागला आहे. देवीच्या आगमनासाठी शहरात विविध मंडळांनी तयारीला वेग दिला असून मंडप, रोषणाई, साउंड सिस्टीम, मूर्तींची सजावट यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांचा व तरुणाईचा सहभाग असलेला हा उत्सव दरवर्षी अधिक बहारदार करण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी निधी जमविण्यात, परवानग्या मिळविण्यात व मंडळाच्या व्यवस्थापनात गुंतले आहेत.
नवरात्रोत्सवाला मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी शहरापुरता मर्यादित असलेला हा उत्सव आता गावोगावी साजरा होऊ लागला आहे. देवीची स्थापना, दांडिया-गरबा, भजन, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तरुणाई व महिलांचे विशेष आकर्षण या उत्सवाकडे आहे. खोपोली-खालापुरातही नवरात्रोत्सवामुळे आर्थिक उलाढालीत लक्षणीय वाढ होते. एका मंडळावर किमान दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या खर्चाची तजवीज करण्यासाठी पदाधिकारी पुरस्कर्ते, उद्योगपती, व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांच्या दारात फेऱ्या मारताना दिसतात.
सोमवार (ता. २२)पासून सुरू होणारा हा उत्सव २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत अव्याहत सुरू राहणार आहे. नगरपालिकेकडून परवाने, वीजपुरवठा जोडणी, तसेच पोलिस प्रशासनाकडून परवानग्या घेण्यासाठी मंडळांचे अर्ज दाखल होऊ लागले आहेत. या उत्सवासाठी लाइव्ह बेंजो, डीजे व दमदार साउंड सिस्टीमची मागणी वाढली असून, त्याच्या तयारीला जोर चढला आहे; मात्र या वर्षी देवीच्या मूर्तींच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंडप सजावट, साउंड सिस्टीम आणि विद्युत रोषणाईच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मंडळांच्या बजेटवर ताण आला असून, पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
.........................
प्रसिद्ध पेणसह खोपोली-खालापुरातील मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या देवीच्या मूर्तींची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. रंगकाम व सजावटीसाठी कारागीर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. स्थानिक व्यवसायिकांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, हा उत्सव आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे. या वर्षी खोपोली नगरपालिका क्षेत्रात सुमारे ३५ हून अधिक नवरात्रोत्सव साजरे होणार आहेत. यामध्ये पंत पाटणकर चौक येथील शिवशक्ती मंडळ, वीणानगर रहिवासी संघ, खोपोली बाजारपेठ नवरात्रोत्सव, लोहणा-मारवाडी समाज, गगनगिरी नगर मित्र मंडळ, काटरंग वैभव नगरी, शिळफाटा व गुजराती समाज मंडळ आयोजित महोत्सव हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. मंडळांच्या वाढत्या खर्चामुळे निधी जमविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.