बायोमेट्रिक सर्व्हेविरोधात नळपाड्यातील नागरिक रस्त्यावर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : नळपाडा झोपडपट्टीच्या सोमवार (ता. ८)पासून सुरू केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला ३०० हून अधिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याविरोधात मंगळवारी (ता. ९) ठाणे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या कार्यालयावर (एसआरए) नागरिकांनी मोर्चा काढला. सुभाषनगर, गांधीनगर परिसराचा सात ते आठ वर्षांपासून पुनर्विकास रखडविणाऱ्या बिल्डरचीच विकासासाठी निवड झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच सर्वेक्षणाला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची मोर्चेकऱ्यांकडून मागणी करण्यात आली. मात्र त्याला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी ठाम नकार दिला.
नळपाडा झोपडपट्टीतून ओमकाली एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ४५१ व नीळकंठेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ५४१ सदस्यांनी एका बिल्डरची निवड करून एसआरएकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र या दोन्ही संस्थांबाबत स्थानिक रहिवाशांना पुरेशी माहिती नाही. या संस्थांचे पदाधिकारी व सदस्य कोण आहेत, याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर एसआरएकडे सर्वेक्षण लांबणीवर टाकण्याची विनंती करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. नळपाडा झोपडपट्टीतील अनेक कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्ताने मूळ ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणी तात्पुरती स्थलांतरित झाली आहेत. तर झोपडपट्टीतील अनेक कुटुंबांना घराचा पुरावा सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. झोपडपट्टीतील काही कुटुंबांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत. त्यामुळे मूळ घरमालकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही, याकडे रहिवाशांकडून लक्ष वेधण्यात येत आहे.
पुनर्विकासाबाबात नागरिक अंधारात
नळपाड्याशेजारील गांधीनगर, सुभाषनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डरचीच पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी झाल्या, याची माहिती नागरिकांना मिळालेली नाही. तर गांधीनगर व सुभाषनगरमधील विस्थापित कुटुंबांना भाडे वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत नळपाड्यातील नागरिकांची फरपट होऊ नये, यासाठी आम्ही लढा देणार आहोत, अशी भूमिका नागरिकांकडून मांडण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.