मुंबईत पाच वर्षांत ४४ हजार घरे
पुनर्विकासासाठी ९१० सोसायट्यांचे विकसकांबरोबर करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सध्या मुंबईत गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत असून, जवळपास गेल्या सहा वर्षांत ९१० संस्थांनी पुनर्विकासासाठी विकसकांसोबत करार केला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत तब्बल ४४ हजारांहून अधिक घरे पुनर्विकासाच्या माध्यमातून उभी राहणार असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या पुनर्विकासासाठी एक लाख ३० हजार कोटींहून अधिकचा निधी लागणार आहे.
मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्ट्यांचा एसआरएअंतर्गत पुनर्विकास करणे मोठे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर नाइट फ्रँकने गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबतच्या सद्य:स्थितीवर अहवाल तयार केला आहे. त्यानुसार २०२०पासून आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांतील ९१० संस्थांनी विकसकांसोबत रीतसर करार केले आहेत. त्यानुसार २०३०पर्यंत या इमारती पूर्ण होणे अपेक्षित असल्याने मुंबईत ४४ हजार २७७ नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पश्चिम उपनगरांत सर्वाधिक ३२ हजार ३५४ घरे असणार आहेत, तर मध्य उपनगरांत १० हजार ४२२ एवढी घरे उपलब्ध होणार आहेत. हा संपूर्ण पुनर्विकास सुमारे ३२६ एकर जागेवर होणार असल्याचे नाइट फ्रँकचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांतील जास्त घरे उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नाइट फ्रँकच्या अहवालात केवळ ज्या संस्थांच्या पुनर्विकासासाठी करार केल्यानंतर आणि त्याची सरकारला स्ट्रॅम्प ड्युटी भरली आहे तेच प्रकल्प यामध्ये विचारात घेतले आहेत.
या पुनर्विकासामुळे सध्या वास्तव्यास असलेल्या लोकांना आपली घरे रिकामी करावी लागणार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत तयार होणाऱ्या घरांच्या तुलनेत आठ टक्क्यांनी भाड्याच्या घरांची संख्या वाढू शकणार आहे. त्यामुळे येत्या काळात घराच्या भाड्यात आणखी वाढ होऊ शकणार आहे.
...
सरकारला ७,८३० कोटींची स्टॅम्प ड्युटी मिळणार
मुंबईत पुनर्विकासाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या घरांच्या माध्यमातून राज्य सरकारला सुमारे सात हजार ८३० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी मिळणार असल्याचे नाइट फ्रँकचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झै यांनी स्पष्ट केले. शहराच्या तुलनेत उपनगरांत घरांची संख्या जास्त असेल असे दिसत आहे. याबाबत बोलताना झै म्हणाले, की तेथे संस्थांची संख्या लहान आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या जास्त संस्था पुनर्विकासासाठी तयार झाल्या असून, त्याचा परिणाम म्हणून घरांच्या संख्येत वाढ दिसत आहे.
...
कुठे किती घरे?
- पश्चिम उपनगरे - ३२,३५४
- पूर्व उपनगरे - १०,४२२
- मध्य मुंबई - १,०८५
- दक्षिण मुंबई - ४१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.