कमी क्षेत्रफळाच्या जमिनीतून अधिक उत्पादन
आयआयटी मुंबई, हैदराबाद विद्यापीठाचे संशोधन
मुंबई, ता. १३ : देशातील शेती क्षेत्रातील प्रश्न कायम असताना मागील चार दशकांत मोठ्या आकाराच्या शेतीपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या शेतजमिनीवरील उत्पादन अधिक राहिल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबई आणि हैदराबाद विद्यापीठाने केलेल्या एका संयुक्त अभ्यासात नोंदवला आहे.
देशातील अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय भागांतील शेतीत उत्पादनक्षमता केवळ शेतजमिनीच्या आकारावर अवलंबून नसून, आवश्यक संसाधनांची उपलब्धता, पत (कर्ज), बाजारपेठेशी संपर्क आणि शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसारख्या घटकांवर अधिक अवलंबून असल्याचे म्हटले आहे. देशात १९७५ ते २०१४ या कालावधीत ‘इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स’कडून संकलित माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले. अकोला, सोलापूर, महेबूबनगर भागांतील माहितीचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले. तसेच या संशोधनात १९७५-८४ या सुरुवातीच्या काळात लहान शेतजमिनींचे उत्पादन तुलनेने जास्त होते; मात्र पुढील काळात विशेषतः २००९-२०१४ दरम्यान अर्ध-शुष्क प्रदेशात कृषी संकट तीव्र झाल्यामुळे लहान शेतजमिनींच्या उत्पादनक्षमतेत घट झाल्याचेही नमूद करण्यात आले.
----
नफा वाढतोच असे नाही!
लहान शेतजमिनी अधिक उत्पादन देतात, हे समीकरण अलीकडे फारसे लागू राहत नाही. उत्पादनक्षमता श्रम, खते, बियाणे आणि यंत्रसामग्री यांसारख्या संसाधनांच्या सघन वापरावर अधिक अवलंबून असते. तसेच अल्पभूधारक शेतकरी एकरी जास्त उत्पादन मिळवतात; पण त्यामुळे नफा वाढतोच असे नाही, असे शोधनिबंधाचे सहलेखक व आयआयटी मुंबईतील प्रो. सार्थक गौरव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.