मुंबई

स्त्रीवादी चळवळीला हवी नवी दिशा

CD

स्त्रीवादी चळवळीला हवी नवी दिशा
स्त्री मुक्ती परिषदेच्या साहित्य संमेलनात मंथन
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १३ : ‘स्त्रीवादी चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत असताना आजही विषमता, अत्याचार, शोषणांसारख्या समस्या कायम आहेत. बदलत्या काळानुरूप पुरुषसत्ताक व्यवस्थेची चौकट मोडण्यासाठी स्त्रीवादी चळवळीला नवी दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेरणादायी साहित्य निर्मिती झाली पाहिजे,’ असे मंथन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या साहित्य संमेलनात मान्यवरांनी केले. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे महिला साहित्य संमेलन शनिवारी (ता. १३) नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या संमेलनाचे अध्यक्षपद सानिया यांनी भूषविले तर उद्‍घाटन कवयित्री उषाकिरण आत्राम यांनी केले. या वेळी व्यासपीठावर शारदा साठे, कवयित्री नीरजा, डॉ. अश्विनी तोरणे, डॉ. प्रज्ञा दया पवार आदी उपस्थित होत्या. संमेलनाच्या अध्यक्षा सानिया यांनी आपल्या भाषणामध्ये स्त्रीवादाची व्याख्या स्पष्ट केली. ‘समानता आणि समता या संकल्पना प्रत्यक्षात अतिशय सोप्या आणि नैसर्गिक आहेत. त्या जाणून, मान्य करून, आपल्या रोजच्या आयुष्यात लागू केल्या, तर माणूस म्हणून एकमेकांना सन्मानाने वागवणे सहज शक्य आहे; पण वास्तवात पाहिले, तर अजूनही स्त्रियांना जमेस धरले जात नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘जगभर समता मान्य झालेली असली, तरी आपण अजूनही ‘महान संस्कृती’च्या नावाखाली भ्रमात जगत आहोत. जाहिराती, सिनेमे, मालिका यांमधून ठरावीक प्रतिमा पुन्हा पुन्हा पुढे आणल्या जातात. आताच्या काळात तर जुन्या, ठरावीक साच्यातल्या प्रतिमांना लोकप्रिय करून विचारशक्ती बधिर करण्याचा राजकीय डाव उघडपणे सुरू असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आज ज्या प्रकारे स्त्रीवाद समजला जात आहे, तो ढोंगी साच्यात अडकलेला असल्याचे फटकारेही त्यांनी मारले. ज्येष्ठ कवयित्री उषाकिरण यांनीही हा धागा धरत महिलांसाठी सुरक्षेचा कायदा आणला पाहिजे, अशी मागणी केली. तर स्त्रियांचे दुःख कथा कविता साहित्यातून व्यक्त झाले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. या वेळी आयोजित परिसंवादात महिला साहित्यिकांनी स्त्रीवादी चळवळ आणि वास्तव यावर चर्चा करण्यात आली.

पुरुषसत्ताक व्यवस्था ओलांडून व्यक्त व्हा : कवयित्री नीरजा
स्त्रियांच्या सोसण्याबद्दलचे लिखाण हे पुरुषप्रधान संस्कृतीला आवडत असते, त्यामुळे असे लिखाण न करता आज या पुरुषप्रधान व्यवस्थेत आपले काय स्थान आहे, हे प्रांजळपणे स्त्रियांनी मांडले पाहिजे. आपण कुठे आहोत आणि कुठे जाण्याची इच्छा प्रकट करतोय, हे सांगितले पाहिजे. आपली कक्षा ओलांडून पुढे जायला हवे, असे परखड मत सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी व्यक्त केले.

दलित साहित्यातून स्त्रीवादी परिवर्तनाचे आकलन
परिसंवादात सहभागी झालेल्या डॉ. अश्विनी तोरणे यांनी दलित साहित्यातील स्त्री चित्रणावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की ‘दलित साहित्यातील स्त्री चित्रण हे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी येथील शोषण परंपरेचे आकलन करून देणारे आहे. दलित साहित्यातील स्त्री चित्रणाद्वारे एकूण भारतीय संस्कृतीचे आणि सामाजिक चिकित्सेचे काम केले आहे. दलित म्हणून पुरुषाला अस्पृश्यतेचे जे चटके सोसावे लागले त्याहून अधिक दलित महिलेला अत्याचाराला सामोरे जावे लागले. दलित स्त्री सामूहिक अत्याचाराची, बलात्काराची, उपभोगाची वस्तू म्हणून उपलब्ध होती. त्यामुळे येथील सांस्कृतिक, धार्मिक चिकित्सा आणि शोषणमूलक सोयीने नाकारता येणार नाही. त्याचे मूळ उच्चाटन करावे लागेल,’ असे त्या म्हणाल्या.

मुस्लिम स्त्री साहित्यिकांना मर्यादा
एकूण साहित्यात मुस्लिम स्त्रियांचे चित्रण पीडित दिसते. मुस्लिम मराठी साहित्य लिहिणाऱ्या स्त्रिया कमी आहेत. माध्यम आणि चित्रपटांमधून मुस्लिम पुरुषांचे वर्णन विद्रूप केले आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची मर्यादा यायला लागली आहे, असे वास्तव लेखिका हिनाकौसर खान यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT