विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ
स्पर्धा, अभ्यासाचे ओझ्यामुळे दबाव
मानसिक आरोग्यासंबंधित आरोग्य विभागाची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. राज्य आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, केवळ एका वर्षात शालेय विद्यार्थ्यांमध्ये तणावाच्या प्रकरणांमध्ये १६० टक्के वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांमधील वाढत्या ताणाबद्दल डॉक्टरही चिंतेत आहेत, तर मानसोपचारतज्ज्ञ वाढती स्पर्धा, अभ्यासाचे ओझे, मुलांचे खेळाच्या मैदानांपासूनचे अंतर आणि मोबाईल फोन ही मुख्य कारणे मानली आहेत.
राज्यातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य सत्रांचे आयोजन केले जाते. २०२४-२५ मध्ये २,७७९ सत्रांचे आयोजन केले होते. यामध्ये १३ हजार ६९९ शालेय विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाशी संबंधित तक्रारी आढळल्या होत्या. त्यापैकी नऊ हजार ४५१ विद्यार्थी वैद्यकीय उपचार करण्यात आले. तर, २०२३-२४ मध्ये पाच हजार २६६ विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाशी संबंधित तक्रारी आढळल्या.
२०२२-२३ या वर्षात १७२० विद्यार्थ्यांमध्ये तक्रारी आढळल्या होत्या.
प्रौढांप्रमाणेच मुलांमध्येही ताणतणाव वाढत आहे. वाढती स्पर्धा, अभ्यासाचे ओझे, प्रथम येण्याचा दबाव, खेळाच्या मैदानांपासून दूर जाणे, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे मुलांमध्ये ताणतणाव वाढत आहे. मुलांना पूर्वी मिळणारे स्वातंत्र्य आता राहिलेले नाही.
- डॉ. शुभांगी पारकर, मनोचिकित्सक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही नैराश्याचा त्रास
२०२४-२५ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ८११ मानसिक आरोग्य तपासणी सत्रे घेण्यात आली. यामध्ये तीन हजार ३०० तरुण तणावग्रस्त आणि नैराश्यात असल्याचे आढळून आले. २०२३-२४ मध्ये ही संख्या तीन हजार ७४९ होती.
दररोज मुलांचे चार कॉल
राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, टेलिमानसवर दररोज सरासरी २६७ कॉल येतात. त्यापैकी चार कॉल १२ वर्षांखालील मुलांचे असतात. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे चिंताजनक असल्याचे सांगितले. या कॉल्सद्वारे असे समोर आले आहे की, मुलांना भावनिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांनी हेल्पलाइनवर भावनिक संकट, शैक्षणिक दबाव, कौटुंबिक वाद आणि ओळखीच्या समस्यांबद्दल बोलले आहे. समुपदेशकांना अनेकदा परीक्षेशी संबंधित ताण, करिअर पर्यायांबद्दल अनिश्चितता आणि अपयशांबद्दल चिंता असलेल्या शालेय विद्यार्थ्यांकडून कॉल येतात.
समाजातील प्रत्येक घटक मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे. आई-वडिलांशी मुले बोलत नाहीत. मोबाईल त्यांचा जोडीदार झाला आहे. मुलं चर्चा करतात. पण, त्यांना वेळ दिला पाहिजे. आम्ही ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मानसिक स्वास्थाविषयी जनजागरुकता केली पाहिजे. पण, आता मुले संबंधित विभागांशी बोलतात. ४५० विद्यार्थ्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. शालेय, कॉलेज जीवनात सगळ्यांना ताण आहेच. पण, इतरांशी बोलून ताण कमी होईल.
-डॉ. नीना सावंत, विभागप्रमुख व मानसोपचारतज्ज्ञ, नायर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.