उल्हासनगरातील डान्स बार पोलिसांच्या रडारवर
बारबालासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : डान्स बारच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियमिततेवर विठ्ठलवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत हंड्रेड डेज आणि ॲपल बारवर छापा टाकला. मध्यरात्रीच्या कारवाईत अश्लील नृत्य करताना बारबाला आढळल्या असून, तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर शहरातील डान्स बारवर पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकाने पुन्हा धडक कारवाई करत अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता श्रीराम चौक परिसरातील हंड्रेड डेज आणि ॲपल बारवर छापा टाकून मोठा पर्दाफाश केला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर कारवाई करण्यात आली. छाप्यात पोलिसांना बारबाला अत्यंत अश्लील नृत्य करताना आढळल्या. या वेळी महिलांसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करून हंड्रेड डेज बारचे तुलसीदास वसीटा, मॅनेजर बालेंद्रसिंह आणि काही बारबाला तसेच ॲपल बारचे रोहित पांडव व दुर्गेश पांडे यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की या बारमध्ये ठरवलेल्या वेळेच्या पलिकडे उशिरापर्यंत बार सुरू होता, शिवाय महिलांकडून अर्धनग्न अवस्थेत अश्लील नृत्य करून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. या प्रकारामुळे समाजातील वातावरण बिघडत असल्याचे स्पष्ट झाले.
कायमस्वरूपी पावले उचलण्याची मागणी
विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्येही तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशावरून ॲपल, नाइन्टी डिग्री आणि हंड्रेड डेज बारवर उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्या मदतीने संयुक्त कारवाई झाली होती. त्या वेळी तब्बल ५० बारबाला आणि ७८ ग्राहकांवर गुन्हे दाखल झाले होते; मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की ही कारवाई कितीही मोठी असली तरी हे बार काही तासांतच पुन्हा सुरू होतात. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे कायमस्वरूपी पावले उचलण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.