पत्नीपीडितांच्या लढ्याला नवे बळ
कायदेशीर, मानसिक आधाराने दिलासा; उल्हासनगरात राज्यस्तरीय मेळावा
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : पत्नीपीडित पुरुषांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन नुकतेच उल्हासनगर येथे करण्यात आले होते. कॅम्प क्रमांक ४ मधील शिवलिला गाजरे हॉलमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक मेळाव्याला महाराष्ट्रभरातून ५०० हून अधिक पुरुषांनी हजेरी लावली. न्यायाच्या शोधात एकत्र आलेल्या या पुरुषांनी आपल्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवत संघर्षाचा नवा निर्धार व्यक्त केला आहे.
मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे पत्नीपीडितांना कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक आधार आणि सामाजिक जागृती यांचा त्रिवेणी संगम होय. उपस्थितांना फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत दाभाडे आणि उपाध्यक्ष तुषार भोसले यांनी विविध कायदेशीर बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. खास करून, पत्नीपीडित पुरुषांना भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या कायदेशीर अडचणी, भारतीय दंड विधानातील संबंधित कलमे आणि त्यांचा योग्य उपयोग याविषयी त्यांनी माहिती दिली.
अनुभवांतून विश्वासाचा पूल
मेळाव्यात सहभागी झालेल्या पुरुषांनी आपले व्यक्तिगत अनुभव, संघर्ष आणि भावनिक वेदना उघडपणे मांडल्या. या अनुभवांची देवाणघेवाण हीच या कार्यक्रमाची खरी ताकद ठरली. एकमेकांच्या कथा ऐकतांना अनेकांना मानसिक दिलासा मिळाला आणि या लढ्यात आपण एकटे नाही, हे ठसवणारा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत झाला. "पत्नीपीडितांचे प्रश्न केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित नसून, समाजासाठीही गंभीर आव्हान आहेत," असा ठाम संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.
संघर्षासाठी व्यापक चळवळ
पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन ही संस्था पत्नीपीडित पुरुषांसाठी कायदेशीर सहाय्य, मानसिक समुपदेशन आणि सामाजिक जागृती या तीन मुख्य आघाड्यांवर कार्यरत आहे. हा मेळावा म्हणजे या चळवळीला मिळालेले नवीन बळ मानले जात आहे. या वेळी संस्थेने आगामी काळात राज्यभरातून अधिकाधिक पुरुषांना एकत्र करून हक्कासाठीची लढाई आणखी व्यापक आणि प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
संघर्षाची दिशा
पत्नीपीडित पुरुषांच्या समस्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या असतानाच, अशा मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांना हक्कांची जाणीव, आधार आणि संघर्षाची दिशा मिळत आहे. समाजात संतुलन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा चळवळींचे महत्त्व नाकारता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.