दीवच्या गणपती उत्सवात मुलांचे विविध कार्यक्रम
पेण (बातमीदार) ः दीव गावातील साखरचौथ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाचे यंदा सतरावे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सवात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले. बुधवार, १० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी विसर्जन व महाभोजनाने करण्यात आली. या काळात विशेषतः लहान मुलांच्या प्रबोधनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता बाल विकास विद्यालयाचे शिक्षक घनश्याम पाटील व हेमंत म्हात्रे यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीसंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर संध्याकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले, ज्यात ह.भ.प. कुणाल ठाकूर यांच्या काळभैरव हरिपाठ मंडळाने सहभाग घेतला. मृदंग साधना हम. अच्युत ठाकूर यांनी केली. १२ सप्टेंबर रोजी मुलांसाठी चित्रकला, निबंध लेखन व वक्तृत्व अशा विविध स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. नितीन म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे व सहकाऱ्यांनी मुलांना मार्गदर्शन करून बक्षिसे वितरित केली. त्याच दिवशी संध्याकाळी नामदेव मोकल व सहकाऱ्यांचे संगीतभजन तसेच जय भवानी महिला नाच मंडळ, शेणे यांचा कार्यक्रम रंगला. त्यानंतर १२ सप्टेंबरच्या रात्री धारेश्वर महिला नाच मंडळ, खारपाळे यांनी लोकनृत्य सादर केले. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पारंपरिक मिरवणुकीत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर महाभोजनाने उत्सवाची सांगता झाली.
...............
मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची हरकत
खालापूर, ता. १७ (बातमीदार) ः मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याच्या शासन निर्णयाविरोधात खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजबांधवांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बुधवारी मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे नेते व कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले आणि तहसीलदार अभय चव्हाण यांना लेखी निवेदन सादर केले. जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट केले गेले, तर मूळ ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व धोक्यात येईल. ओबीसी प्रवर्गातील आरक्षित जागांवर मराठा समाज दावा करू शकतो, ज्यामुळे आधीपासूनच मर्यादित संधी आणखी कमी होतील, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. या वेळी दत्तात्रय मसूरकर, संतोष जंगम, संतोष गुरव, श्रीकांत पुरी, दिनकर भुजबळ, अरुण पुरी, समीर मसूरकर, कोहिनूर चव्हाण, सुरेखा खेडकर आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाविरोधात आक्रोश नोंदवला. ओबीसी समाज ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिला असून, आजही शिक्षण, नोकरी व राजकारणात त्यांचे प्रतिनिधित्व मर्यादित आहे. अशा परिस्थितीत ओबीसीच्या जागांवर मराठा समाजाचा दावा झाल्यास मूळ ओबीसींना मागे टाकले जाईल. शासनाने तत्काळ जीआर मागे घेऊन ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
....................
माणगाव पोलिस दलाचा वृक्षारोपण उपक्रम
माणगांव (वार्ताहर) ः ‘हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी माणगांव पोलिस दलाने वृक्षारोपण उपक्रम राबविला. ओझोन थर संरक्षण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात पोलिस अधिकारी व नव्याने भरती झालेल्या तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हा उपक्रम रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण झाले. सहाय्यक पो. नि. नरेंद्र बेलदार यांनी नव्या भरती झालेल्या जवानांसह प्रत्यक्ष श्रमदान केले. या उपक्रमात पोलिस स्थानक आवार, गजानन महाराज मंदिर परिसर व विकास कॉलनी भागात वृक्षारोपण करण्यात आले. यंदा माणगाव शहरात एकूण ४७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यात ताम्हण, आवळा, कांचन, खैर आदी झाडांचा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५० रोपांची लागवड करण्यात आली. लागवड केलेली झाडे औषधी, खाद्य, सावली, इंधन व माती संरक्षणासाठी उपयुक्त असून, कार्बन शोषणाद्वारे पर्यावरण संरक्षणासही मदत करतील. शासनाने २०२५ मध्ये १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी माणगाव उपविभागीय पोलिस कार्यालयासाठी २०० आणि माणगाव पोलिस ठाण्यासाठी २७५ असे एकूण ४७५ वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. या उपक्रमामुळे ‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेला चालना मिळून पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे.
...............
खोपोली रोटरी क्लब हॉलचे केअरटेकर मृतावस्थेत आढळले
खोपोली (बातमीदार) ः खोपोली येथील रोटरी क्लब हॉलचे केअरटेकर सुरेश अनंत पौडवाल (वय ७०, रा. पेण, जि. रायगड) मृतावस्थेत आढळले. तीन दिवसांपासून ते ड्युटीवर आले नव्हते आणि त्यांचा मोबाईलही बंद असल्याने शंका निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी हॉलमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. शिबिरासाठी आलेल्या नागरिकांनी रूमचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे व पूजा चव्हाण यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पौडवाल यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. मात्र मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. सुरेश पौडवाल हे भानवज, खोपोलीतील सहकारनगर भागातील रहिवासी होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.