उद्योगनगरीत अग्नितांडव
उरणमधील प्रकल्पांमध्ये दुर्घटनांचे सत्र, सुरक्षा वाऱ्यावर
उरण, ता. १७ (वार्ताहर) : तालुक्यात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस, एनएडी, अदाणी व्हेंचर्ससारखे वायू, रसायनांवर प्रक्रिया करणारे विविध प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये होणाऱ्या दुर्घटना, आगीच्या घटनांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे कधीकाळी बंदर, औद्योगिक वसाहतींचे केंद्र असलेले ही उद्योगनगरी आता अतिसंवेदनशील, धोकादायक क्षेत्र झाले आहे.
उरण येथील ओएनजीसीच्या वायू प्रक्रिया केद्रांत वाहिनी गरम झाल्याने सोमवारी (ता. ८) भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागाव, म्हातवली परिसर भूकंपाप्रमाणे हादरला होता. अनेक वस्त्यांमधील घरांच्या काचा फुटल्या. आगीचा भडका, धुराने परिसरात घबराट पसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे उरण परिसरातील नागाव, म्हातवली, उरण शहर, पिरवाडी आदिवासी वाडी, चाणजे, दाऊरनगर, मुळेखंड गावांच्या सुरक्षा धोक्यात आली आहे.
----------------------------------------------
दुर्घटनांची आकडेवारी
वर्ष नुकसान
१९ मार्च २०२५ : गॅस कॉम्प्रेसरला आग
३१ मार्च २०२४ : आगीत दोन कामगारांचा मृत्यू
२५ सप्टेंबर २०१९ : नाफ्ताची गळती होऊन आग
३ सप्टेंबर २०१९ : नाफ्ता गळती, आगीमुळे अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू
२४ ऑगस्ट २०२० : तेल गळतीमुळे आग
१८ सप्टेंबर २०२४ : तेल गळतीने आग
३१ मार्च २०२२ ः ड्रेनेज पाणी साठवणूक तलावाला आग
--------------------------
प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उरण तालुक्यात गेल्या काही महिन्यात अतिज्वलनशील रसायनांमुळे आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये सामवेदा, वैष्णवी, जेएनपीए जवळील आर. के. लॉजिस्टिक, जीडीएल उरण शहरातील भंगार गोदामातील भीषण आगीचा समावेश आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी ओएनजीसीतील स्फोटात एका अधिकाऱ्यासह चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा घटना पाहता प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
----------------------------
दुर्घटनांची कारणे
- अनेक गोदामे, सीएफएसमध्ये नियमबाह्य काम होत आहे. येथे कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी अग्निशमन दलही कार्यरत नाही. सिडको, ओएनजीसी, जेएनपीए, जीटीपीएस, एनएडी स्वतःचे अग्निशमन दल, गाड्या आहेत.
- छोट्या-मोठ्या प्रकल्पांकडे ही सुविधा नसल्याने आग लागल्यास सिडको, नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलवावे लागते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिकांनी आणि संघटनांनी सर्व प्रकल्पांनी मिळून अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची गरज आहे.
---------------------------------
भविष्यात मोठे संकट
तालुक्यातील वाढत्या दुर्घटना पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे. परिसराची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापन योजना तयार करण्याची मागणी होत आहे.
़़ः--------------------------------
धोका असलेली गावे - सात
लोकसंख्या - ६० हजार
-----------------------
नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेसंदर्भात पत्र पाठविले आहे. ओएनजीसीकडून खुलासाही मागवला आहे. आमच्या दोन्ही ग्रामपंचायतींची बैठक घेऊन नुकसान झालेल्या घरांच्या नुकसानभरपाईसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- चेतन गायकवाड, नागाव सरपंच
--------------------------
ओएनजीसी प्रकल्पामध्ये अत्याधुनिक अग्निशमन दल आहे. अशा घटना घडू नये, यासाठी त्यांना वारंवार सूचना करीत असतो. यंत्रणा वाढवण्यासाठी ओएनजीसीला कळवले आहे. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
- उद्धव कदम, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.