टीईटी परीक्षेबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने सप्टेंबर (ता. ११)मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर (ता. २३) ला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांमध्ये टीईटी परीक्षा द्यावी का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर (ता. १) मध्ये दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षांत उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे. तसेच ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीस पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. टीईटी परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी आजपर्यंत कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याबाबत केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांनी अधिकृत पत्र जारी केलेले नाही. जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, खासगी शाळांतील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. नापास विद्यार्थ्यांना पास असल्याबाबत टीईटी प्रमाणपत्र वितरीत केल्याचा २०१९मध्ये घोटाळा झाला होता. याबाबत अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसून खोटे टीईटी पास प्रमाणपत्र असलेले शिक्षक आजही कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. टीईटी परीक्षेऐवजी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम प्रभावीपणे वापरण्याची गरज असल्याचे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.
..................
शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी टीईटीऐवजी कोठार कार्यवाही
संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्वंकष व दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे. दर्जाहीन शाळांवर शिक्षण विभागाने धडक कारवाई करावी. मुख्याध्यापक अथवा शिक्षक कामात दिरंगाई करीत असल्यास वेतन वाढ थांबवणे किंवा पदोन्नती नाकारणे यासारखे शासन करण्यासाठी परीक्षण व्यवस्था निर्माण करायला हवी. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. शिक्षकांना केवळ शिकवण्याचे काम देऊन त्यांची सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून सुटका केली जावी. मुख्याध्यापक व शिक्षकांना कामाचे स्वातंत्र्य देऊन अपयशासाठी जबाबदार धरा. मात्र केवळ टीईटी परीक्षा हा गुणवत्तेचा निकष होऊ शकणार नसल्याचे शिक्षक संघटना सांगत आहेत.
२३ नोव्हेंबरला होणारी टीईटी कोणी द्यावी?
१) डीएड व बीएड उत्तीर्ण आणि टीईटीच्या अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या पात्रताधारक शिक्षकांनी पवित्र पोर्टलद्वारे अथवा जाहिरातीद्वारे अनुदानित, विनाअनुदानित अथवा सेल्फ फायनान्स शाळांमध्ये नोकरी हवी असल्यास २३ नोव्हेंबरला होणारी टीईटी देणे आवश्यक आहे.
२) २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी
३) बीएड पात्र सहावी ते आठवीच्या गटात कार्यरत असलेल्या शिक्षकांनी
४) टीईटी परीक्षा अथवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी पुन्हा टीईटी देण्याची आवश्यकता नाही.
टीईटी उत्तीर्ण होणे म्हणजे गुणवत्ता नव्हे. महाराष्ट्रात होणारी टीईटी परीक्षा भ्रष्टाचार व गोंधळाने भरलेली आहे. टीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम व टीईटी परीक्षेचे स्वरूप निश्चित नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून टीईटी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शिक्षकांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच टीईटी परीक्षेसंदर्भात पारदर्शकता नाही. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना भेटून महाराष्ट्रातील शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली जाणार आहे. - सुभाष मोरे, कार्यध्यक्ष, शिक्षक भारती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.