स्थानिक हातहोड्यांची नोंद घ्यावी
नवी मुंबईतील मच्छीमार संघटनेची मागणी
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : कोळीबांधवांचा धंदा हा खबरदारी आणि मोठ्या जोखमीचा असतो. अशा परिस्थितीतही मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळीबांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई छोट्या मच्छीमारांना मिळत नाही. हे मच्छीमार मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडून हातहोड्यांची नोंद करण्याची मागणी नवी मुंबईतील कोळी समाज करत आहे.
मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या होड्यांची नोंद घेण्यासाठी खाडीकिनारी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत, मात्र त्यांच्याकडून केवळ सिलिंडरवर चालणाऱ्या होड्यांचीच नोंदणी केली जात आहे, तर हातहोड्यांची नोंदी करण्याची मागणी एकविरा मच्छीमार संस्थेचे परशुराम मेहेर यांनी केली आहे. सध्या मासेमारी हंगाम बंद असला तरी या दरम्यानच्या काळात या नोंदी घेतल्या जाव्यात, अशी भावना नवी मुंबईतील मच्छीमारांची आहे. नवी मुंबईतील स्थानिक मूळ रहिवासी असलेल्या आगरी -कोळी बांधवांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे. खाडीकिनारी आणि खोल समुद्रात मासेमारी करणे सध्या शासनाने प्रतिबंध केले आहे. सध्या मासेमारी बंद असली तरी लवकरच मासेमारी सुरू होईल. त्यानंतर समुद्रात तैनात सुरक्षा रक्षकांकडून मासेमारी करणाऱ्या नागरिकांची नोंद केली जाईल. वर्षानुवर्षे केवळ सिलिंडरवर चालणाऱ्या होड्यांची शासनाकडून नोंद होते. परिणामी हातहोड्यांची नोंद केली जात नसल्याने त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत, अर्थसहाय्य वा आपत्कालीन नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे ऐरोली ते दिवाळे आणि बेलापूर ते पनवेल कोळीवाडापर्यंतच्या सुमारे तीन हजार मच्छीमारांच्या हातहोड्यांची नोंद केली जावी, अशी मागणी होत आहे.
..................
नवी मुंबई शहरास मोठा खाडीकिनारा लाभला असून, आजही हातहोडीतून सर्रास मासेमारी केली जाते. मोजक्याच मच्छीमारांकडे मोठ्या ट्रॉलर आहेत, तर काही लोक सिलिंडरवर होड्या चालवतात, मात्र हातहोड्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना सुरक्षा आणि सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे मत मच्छीमार कोळीबांधवांकडून सांगण्यात येत आहे. नवी मुंबईतील विविध ठिकाणी मासेमारी करण्याऱ्या मच्छीमारांना परवाना दिला जातो. काही मासेमारी करणाऱ्या नागरिकांना पालघर तर काहींना ट्रॉम्बे तर काहींना वसई येथील मत्स्य विभागाकडून परवानगी दिली जाते, परंतु समुद्रात जाताना हातहोड्यांची नोंद करणे गरजेचे आहे; पण नोंद केली जात नसल्याने मच्छीमारांना अनेक सेवा सुविधांचा लाभ घेता येत नाही, असे दिवाळे गावातील मच्छीमार ज्ञानेश्वर कोळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.