‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चितीवर भर
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देश
ठाणे, ता. १७ : जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांसाठी ‘होल्डिंग प्लॉट्स’ (थांबवण्याची जागा) निश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासोबतच प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व पर्यायी मार्गांचा वापर, यासाठीही तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मंगळवारी (ता. १६) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी भूषवले.
ठाणे जिल्ह्यातून जेएनपीए, अहमदाबाद हायवे, पालघर आदी मार्गांवरून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून या वाहनांसाठी होल्डिंग प्लॉट्स निश्चित केले जाणार आहेत. अवजड वाहनांची शहरात प्रवेशाची वेळ मर्यादित करण्यात येणार आहे. रात्री १२ वाजल्यापासून सकाळी सहापर्यंतच शहरात अवजड वाहनांना प्रवेश असणार आहे. बैठकीस मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त निकीत कौशिक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्यासह अन्य अधिकारी प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीदरम्यान वाहतूक नियंत्रण, रस्ते सुस्थितीत ठेवणे, प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, पर्यायी मार्ग आदींवर सखोल चर्चा झाली.
पर्यायी मार्ग
बैठकीत घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी नाका, शिळफाटा, कल्याण बायपास आदी वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालील उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.
संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
पर्यायी मार्गांची आखणी व दिशादर्शक फलकांची स्थापना करावी.
शहरातून बाहेर पडणाऱ्या व शहरात येणाऱ्या वाहनांच्या संख्येचा ताळमेळ घालावा.
प्रशासनाची कसरत
नाशिक, पालघर, मुंबई-पुणे आणि जेएनपीएकडून येणाऱ्या वाहनांची संख्या १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाला वाहतूक नियोजनात तारेवरची कसरत करावी लागत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्टपणे सांगितले, की वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, हे आपल्याच सोयीसाठी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.