स्कूल व्हॅनला नवसंजीवनी
परिवहन विभागाचा मोठा निर्णय; पनवेलसह राज्यभरातील वाहकांना दिलासा
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नऊ प्लस एक म्हणजे १० आसन क्षमतेच्या टाटा मॅजिक वाहनांना आता ‘स्कूल व्हॅन’ म्हणून परवानगी देण्यात आली आहे. तसेच स्कूल बस आणि व्हॅन यांना स्वतंत्र व्याख्या देत शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे पनवेल परिसरातील सुमारे ७०० वाहनधारकांना तसेच राज्यभरातील शेकडो विद्यार्थी वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पूर्वी तीनआसनी रिक्षांमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जात होती. मात्र सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून ही वाहतूक बंद करण्यात आली. त्याला पर्याय म्हणून सात प्लस एक क्षमतेच्या टाटा मॅजिक व्हॅनना परवानगी मिळाली होती. या वाहनांतून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक केली जात होती. परंतु २०१८मध्ये स्कूल बसमालक संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या व्हॅनवर गदा आली. दरम्यान, केंद्र शासनाने १४ प्लस एक आसन क्षमतेची वाहनेच स्कूल बस म्हणून मान्य करण्याचा निर्णय घेतल्याने छोट्या स्कूल व्हॅनचालकांवर संकट आले. त्यातच कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने या वाहनधारकांवर आर्थिक संकट कोसळले.
या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ आणि पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. सल्लागार हरीश बेकवडे, अध्यक्ष पांडुरंग हुमणे आणि सचिव संतोष गोळे यांच्या नेतृत्वाखालील या प्रयत्नांना आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभले. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सध्याची परिस्थिती, अंतर्गत रस्त्यांची रुंदी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने लहान वाहनांची उपयुक्तता याचा अभ्यास करून हा निर्णय घेतला.
या अधिसूचनेनुसार १४ प्लस एक आसन क्षमतेची वाहने ‘स्कूल बस’ म्हणून ओळखली जातील, तर त्यापेक्षा लहान क्षमतेची विद्यार्थी वाहने ‘स्कूल व्हॅन’ म्हणून गणली जातील. यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. या निर्णयाचे विद्यार्थी वाहतूक महासंघ व पनवेल वाहक संस्थेकडून स्वागत करण्यात आले आहे.
...................
चौकट :
शाळा करारनाम्यात शिथिलतेची मागणी
स्कूल व्हॅन परवाने मिळवण्यासाठी शाळेसोबतचा करारनामा बंधनकारक आहे. परंतु अनेक शाळा व्यवस्थापनांकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे विद्यार्थी वाहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली असून, लवकरच यावर बैठक होणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.