ठाण्यात नवदुर्गा वेलनेस सायकल राईड
नवरात्रीत महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित अनोखा उपक्रम
ठाणे, ता. १८ (बातमीदार) : सगळीकडे नवरात्रीनिमित्त लगबग सुरू असताना भाविक हा नवरात्रोत्सव देवीच्या उपासनेसह उत्साह, संगीत, गरबा आणि रंगतदार साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या नवरात्रोत्सवात महिलांना विशेष मान दिला जातो, मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच या महिलांसाठी ठाण्यात “नवदुर्गा महिला वेलनेस सायकल राईड”चे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, ठाणे आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, (ता. २१) सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता ही राईड पार पडणार आहे. ही राईड मोफत असून, सर्वांसाठी खुली असून, यात महिला व पुरुष सहभाग घेऊ शकतात.
नवरात्रीच्या निमित्ताने महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला समर्पित अशी सायकल राईड ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. “नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. त्या शक्तीला खऱ्या अर्थाने जपण्यासाठी महिलांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. या राईडमधून समाजात त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे,”अशी माहिती या वेळी आयोजक ज्ञानदेव जाधव यांनी दिली.
चौकट
सायकल राईडचा मार्ग
ठाण्याच्या तीन हात नाका येथील श्री तुळजाभवानी मंदिर येथून या राईडची सुरुवात होणार असून, तीन हात नाका सिग्नल मार्गे हरी निवास सर्कल - वंदना टॉकीज - राम मारुती रोड - गोखले रोड - मल्हार सिग्नल - सरस्वती स्कूल - अभिनय कट्टा - भास्कर कॉलनी - जिजामाता गार्डन येथील श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, अभिनय कट्टा, भास्कर कॉलनी येथे या राईडची सांगता होणार आहे. या अनोख्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक व समाजसेवक किरण नाकती हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोट
नवदुर्गा महिला वेलनेस सायकल राईडमध्ये सहभाग घेणाऱ्या सायकलप्रेमींना थीमवर आधारित स्लोगन लावण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच सर्व स्पर्धकांसाठी नाष्टा, सरप्राइज स्पर्धादेखील आयोजित केल्या आहेत. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सायकलप्रेमींचा मेडल देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच ज्ञानदेव जाधव यांच्याशी ८६५२०२०८७७ या क्रमांकावर नावनोंदणीसाठी करण्याचे आवाहन केले आहे.
-अजय भोसले, सायकलप्रेमी फाउंडेशन