उरणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
दिघोडे चौकात काँक्रिटीकरणाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात
उरण, ता. १८ (वार्ताहर) ः रानसई ते चिरले या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने ठेकेदाराच्या माध्यमातून दिघोडे चौकात हाती घेतली आहे. त्यामुळे आता दिघोडे चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
जेएनपीएच्या अनुषंगाने उरणच्या पूर्वभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर सीएफएस जाळे पसरले आहे. त्यामुळे या परिसरात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवजड वाहतुकीमुळे या परिसरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांची अवजड वाहतुकीसाठी क्षमता नसल्याने वारंवार या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडून मार्गाची दुरवस्था होत आहेत. तसेच, वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या खड्डेमय रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा त्रास या परिसरातील प्रवाशांना, विद्यार्थी, नोकरवर्ग व रिक्षाचालक यांना सातत्याने भेडसावत आहे. अनेकदा तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे. या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.
हा मार्ग अद्यावत व्हावा, अशी मागणी सातत्याने येथील नागरिकांकडून होत होती. याची दखल उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी घेतली असून यासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सरकारच्या हॅम या योजनेतून रानसई धरण ते चिरले या मार्गासाठी काँक्रिटीकरणाच्या कामासाठी जवळपास ४१ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. याची निविदा होऊन ठेकेदारही नेमण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवातही होणार आहे.
मात्र, या मार्गावर पूर्वी एमआयडीसी आणि आता सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यासाठी संपादित केलेल्या रस्त्याच्या जागेमध्ये अनेक अतिक्रमण वाढले आहेत. या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ता बनवण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. त्या अनुषंगाने हे अडथळे दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने ठेकेदाराच्या माध्यमातून गुरुवारी (ता. १८) ही मोहीम पोलिस बंदोबस्तासह हाती घेतली असून अतिक्रमणे हटविले आहेत. त्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाला कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.