बदलापुरात जागोजागी कचरा
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अस्वच्छता
बदलापूर, ता. २० (बातमीदार) : शहरामध्ये सध्या स्वच्छतेची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा होत आहेत. यामुळे एकेकाळी स्वच्छतेच्या स्पर्धेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर झळकलेले बदलापूर शहर आता घाणीत बुडत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषतः शहराच्या पश्चिम भागातील शनिनगर रस्ता, मुख्य बाजारपेठ, स्थानक परिसर आणि पदपथांच्या आजूबाजूचे क्षेत्र या सर्व ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे वातावरणात दुर्गंधी पसरत आहे. झाडांच्या फांद्या, प्लॅस्टिक, घरगुती कचरा, बांधकामाचा मलबा यांसारखा संमिश्र कचरा सर्रास टाकला जात आहे. काही ठिकाणी तर पालिकेने ‘येथे कचरा टाकू नये’ असे फलक लावलेले असतानाही, त्या फलकांच्या खालीच कचराकुंडी तयार झालेली आहे - ही बाब केवळ हास्यास्पदच नव्हे, तर प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवणारी ठरते.
शहरातील काही सुजाण नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला असून, ‘फक्त नागरिकच नव्हे, तर पालिकेनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. २०२२ मध्ये मिळालेल्या सन्मानानंतर, स्वच्छतेकडे पालिकेने पाठ फिरवलेली आहे, अशी स्पष्ट टीका केली जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बेजबाबदार नागरिकही यात हातभार लावत असून, घरगुती आणि व्यापारिक कचरा रस्त्यावरच टाकण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. अशा व्यक्तींवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने, त्यांना कुठलीही भीती राहिलेली नाही.
दंडात्मक कारवाईची गरज
शहराच्या स्वच्छतेसाठी केवळ पालिका नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. स्वतःच्या घरासोबत सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणारे उपक्रम किंवा कठोर कारवाई यांची तातडीने गरज आहे. बदलापूर शहर पुन्हा एकदा स्वच्छ होण्यासाठी, पालिकेने धोरणात्मक आणि ठोस पावले उचलून, तसेच कचराकुंडी तयार होणाऱ्या ठिकाणी त्वरित साफसफाई करून, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अत्यंत आवश्यक ठरते, असे मत शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.