औद्योगिक वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागणार
मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची होणार सुटका
बोईसर, ता. २० (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनलचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे येथील मालवाहू अवजड वाहने मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जात असून, यामुळे वाहतूक कोंडीसह रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये मालाची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. येथे ट्रक टर्मिनलची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्व अवजड वाहने येथील मुख्य रस्ते तसेच रहिवासी भागातील अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा उभी करून ठेवण्यात येतात. यामुळे वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास इतर वाहनचालक, कारखान्यांत काम करणारे कामगार यांना सहन करावा लागत आहे.
तारापूरमध्ये ट्रक टर्मिनलची सुविधा करण्यासाठी कारखानदार आणि नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षण असलेला सध्याचा भूखंड हा गैरसोयीचा असून, भूखंडावर अतिक्रमण झाल्याने ट्रक टर्मिनलचा प्रश्न रखडला होता. यामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार असून, अपघातांचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन कंपनीसमोरील सात एकरांचा मोकळा भूखंड वाहनतळासाठी निश्चित केला आहे.
तारापूर ही राज्यातील एक प्रमुख औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी पोलाद, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रसायन आणि कापड क्षेत्रातील जवळपास १,२०० ते १,५०० कारखाने सुरू आहेत. यामध्ये मोठे ८५, मध्यम ७५, कारखाने असून, १,१०० लघुउद्योजक आहेत. सुमारे दोन ते अडीच लाख कामगार असणाऱ्या या क्षेत्रातील कारखान्यांमध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी मागील काही वर्षांपासून अवजड वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही वाहने उभी करण्यासाठी कायमस्वरूपी वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्व अवजड वाहने औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यांवर, बोईसर-चिल्हार मार्ग तसेच रहिवासी भागांतील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा उभी केली जातात. त्यामुळे अपघातांच्या घटना घडतात. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. त्याचा इतर प्रवासी वाहने, सामान्य नागरिक, पादचारी आणि कारखान्यांतील कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
चौकट
सात एकरांचा भूखंड निश्चित
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन कंपनीसमोरील ओएस १/ए हा मोकळा भूखंड वाहनतळासाठी निश्चित केला आहे. सात एकर क्षेत्रफळाच्या या भूखंडावर जवळपास ५०० मालवाहू अवजड वाहने उभी राहू शकणार आहेत. या ठिकाणी पार्किंगसोबतच चालक व वाहक यांच्यासाठी विश्रांतीगृह, उपाहारगृह आणि शौचालय यासारख्या सोयीसुविधादेखील निर्माण केल्या जाणार आहेत.
पर्याय म्हणून वाहनतळासाठी सोयीस्कर असा औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉना कंपनीसमोरील सात एकरांचा मोकळा भूखंड वाहनतळासाठी निश्चित केला आहे. वाहनतळाचा प्रस्ताव ठाणे येथील प्रादेशिक कार्यालयातून वरिष्ठ कार्यालयात अंतिम मंजुरीकरिता पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मान्यता मिळण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला आहे. मुख्य नियोजक आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी मान्यता देणार आहेत.
बोईसर-पालघर मुख्य रस्त्याशेजारी एएम ३७ हा ५,२१५ चौरस मीटर भूखंड वाहनतळासाठी आरक्षित होता. मात्र हा भूखंड रेल्वे रुळालगत असल्याने आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्यांनी अतिक्रमणा करून बस्तान बसविल्याने हा आरक्षित केलेला भूखंड वाहनतळासाठी अडचणीचा ठरता होता. सध्या हा भूखंड विनावापर पडून आहे.
ट्रक टर्मिनलसाठीचे आरक्षण बदलून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा सेवासुविधांसाठी आरक्षित असलेला ओएस १/ए या २२,२३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी मागणी मान्य झाली.
प्रतिक्रिया -
औद्योगिक क्षेत्रातील वाहनाची वर्दळ बघता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळ ओएस १/ए या सेवासुविधांसाठी असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी ट्रक टर्मिनलचे आरक्षण करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. पुढील काही दिवसांत होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असून, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया चालू आहे. येथे गॅरेज, विश्रांतीगृह, उपाहारगृह आणि शौचालय यासारख्या सोयीसुविधादेखील देण्यात येतील.
- अविनाश गजानन संखे उपअभियंता, तारापूर औदयगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तारापूर बोईसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.