नागपूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आधारभूत दरानुसार (MSP) सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात भिवापूर, कळमेश्वर, काटोल, उमरेड, नरखेड, रामटेक आणि सावनेर ही सात खरेदी केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, सातबारा, आठ-अ, तसेच बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष हजेरी लावणे आवश्यक आहे. यासोबतच एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच माल केंद्रावर आणावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.