मानाच्या देवींचा थाट अन् उत्साहाला उधाण
भव्य मंडप, आकर्षक सजावट, लखलखणारी रोषणाई
ठाणे, ता. २१ (बातमीदार) ः आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करून निरोप दिल्यानंतर आता शारदेय नवरात्रोत्सवासाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. येथील मानाच्या देवींसाठी भव्य मंडप उभारण्यात आले असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कमानी आणि लखलखणाऱ्या रोषणाईने ठाण्याच्या रस्त्यांवर झगमगाट पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करणार आहेत. त्यासाठी आयोजकांची सर्व तयारी झाली आहे.
टेंभीनाका दुर्गेश्वरी देवी ः
नवसाला पावणारी टेंभीनाक्याची दुर्गेश्वरी देवी शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दुर्गेश्वरी देवीची स्थापना केली. हे नवरात्रोत्सव मंडळ ठाण्यातील प्रसिद्ध मंडळांपैकी एक आहे. यंदादेखील नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करणार आहे. यंदा टेंभीनाका दुर्गेश्वरी देवीसाठी वृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात आला असून हा देखावा प्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला जात आहे. तसचे ठाण्याची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असल्याने दरवर्षी लाखो भाविक साकडे घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी अनेक कलाकार, दिग्दर्शक, नेते मंडळी आदी मान्यवर देवीच्या दर्शनासाठी भेट देत असतात. यादरम्यान मोठी जत्रादेखील या ठिकाणी भरते. या नवरात्री उत्सवात भजन, महाआरती, आरोग्य शिबिर, गोंधळ, महिलांसाठी विविध कार्यक्रम आणि पारंपरिक कार्यक्रम राबविले जातात.
संकल्प नवरात्री दांडिया, रघुनाथनगर ः
महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्रोत्सव प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री अंबे मातेच्या खऱ्याखुऱ्या मंदिरात साजरा होतो. या संकल्प नवरात्री दांडिया उत्सवाची सुरुवात संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांना केली असून या उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता व अभिनेत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी विशेष गर्दी करतात. ‘संकल्प दांडिया २०२५’चे यंदा २०वे वर्ष असून दांडिया नृत्य करणाऱ्यांना दररोज बक्षिसे तसेच नऊ दिवस उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यांना आणि महिला व पुरुष नर्तकाला सादर करणाऱ्यांना विशेष बक्षीस दिले जाते. यामुळे येथे लाखोंच्या संख्येने गरबा रसिक गर्दी करीत असून या दांडियाचा आनंद लुटतात.
एमसीएचआय रासरंग नवरात्री उत्सव
एमसीएचआय ठाणे रासरंग २०२५ हा ठाण्यातील एक भव्य नवरात्री उत्सव असून जो धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि क्रीडाई एमसीएचआय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. यावर्षी रेमंड ग्राउंडवर या उत्सवाचे आयोजन केले जात असून, यामध्ये बॉलीवूड संगीतकार उमेश बारोट यांच्यासह इतर कलाकार सहभागी होणार आहेत. दरम्यान, या ठिकाणी मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध सांस्कृतिक व प्रसिद्ध सिनेमातील गाण्यांवर तरुणाई थिरकताना पाहायला मिळते. या नवरात्रोत्सवात संस्थेतर्फे रसिकांसाठी अनेक स्पर्धाही या राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गरबा रसिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत या नवरात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात.
नवयुग मित्र मंडळ नवरात्री उत्सव, टिकुजिनीवाडी
नवयुग मित्र मंडळ नवरात्री उत्सवाचे यंदाचे २५वे वर्ष असून या उत्सवाची सुरुवात माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे आणि माजी नगरसेवक रमेश आंब्रे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पारंपरिक, सांस्कृतिक आदी उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये मराठा, वाल्मीकी, तेलुगू, उत्तर भारतीय, सिंधी, अग्रवाल, केरला, गुजराती, कन्नड आदी समाजांचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये सप्तशृंगी पाठ, हरिपाठ, भजन संध्या, भव्य आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, हवन, महाप्रसाद, मुख्यमंत्री आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी कॅन्सर नमोग्राफी कॅम्प आदी विविध कार्यक्रमदेखील ठेवण्यात आला आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्या पूजन व सन्मान सोहळा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या उत्सवात विविध उपक्रमांमुळे रासप्रेमी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात.
शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव
भव्यदिव्य आणि आकर्षक देखाव्यांची परंपरा जपणाऱ्या शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवात यंदा नवीन देखावा साकारत येणार आहे. तसेच ही देवी शिवाईनगरीची माउली म्हणून प्रसिद्ध आहे. या नवरात्री उत्सवाची सुरुवात शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी केली आहे. भाविक, कलारसिक यांना डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी मंडळातर्फे नयनरम्य देखावे साकारले जातात. पौराणिक सजावट आणि काल्पनिक राजमहल असे अनेक देखावे आजवर मंडळाने उभारले आहेत. त्यामुळे अनेक भाविक याठिकाणी गर्दी करीत असतात.
राज राजेश्वरी देवी, लुईसवाडी
जय माता शेरावाली सेवा मंडळातर्फे ठाण्याची राज राजेश्वरी देवी ही लुईसवाडी येथे स्थापित केलेली देवी असून या देवीची १९९४ मध्ये स्थापना झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुंदर काल्पनिक मंदिराची प्रतिकृती साकारली असून येथे देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात. तसेच या उत्सवादरम्यान भजन, होमहवन, महाआरती, महाप्रसाद, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येत असतात. राज राजेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अनेक राजकीय नेते, कलाकार, दिग्दर्शक आदी मान्यवर उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटतात. दरम्यान, याठिकाणी गरबा रसिकांसह अनेक इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
या सहा नवरात्री उत्सवांसह कळव्यातील संघर्ष नवरात्री उत्सव, एकता मित्र मंडळ, पाचपाखाडी, चंदनवाडी गणेश मंडळ, शास्त्रीनगरची देवी अशा अनेक सुप्रसिद्ध नवरात्रोत्सवात रास रसिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत असते. यंदादेखील या सर्व मंडळांनी नवरात्री उत्सवासाठी जय्यत तयारी केली असून गरबा रसिकांसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे रास रसिकांसह भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.