शाळांमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग
विद्यार्थी-शिक्षकांत उत्साह; सजावट, भोंडला, गरबा, खाऊवाटपासह विविध उपक्रम
पाली, ता. २२ (वार्ताहर) : नवरात्रोत्सव म्हटले की भक्तिमय वातावरणाबरोबरच आनंद, उत्साह आणि नवचैतन्याला उधाण येते. गावागावाप्रमाणेच जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्येही घटस्थापनेपासून देवी सरस्वतीची स्थापना करून शारदोत्सव उत्साहात साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. सध्या अनेक शाळांमध्ये साफसफाई, सजावट आणि कार्यक्रम नियोजन यांची लगबग सुरू असून विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन उत्साहाने तयारी करत आहेत.
शाळांमध्ये वर्गखोल्या रंगवणे, पताके-फुलांची सजावट करणे, लाकडी आरास किंवा देव्हाऱ्यात मूर्ती ठेवून प्राणप्रतिष्ठा करणे, तसेच वीजरोषणाई लावणे अशा कामांना वेग आला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून साफसफाई करताना दिसून येत आहेत. या नऊ दिवसांच्या कालावधीत रोजच्या कार्यक्रमांचे नियोजन विद्यार्थी स्वतः करत असून अभ्यासाबरोबर सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना मोठे महत्त्व दिले जात आहे.
..............
नऊ दिवस कार्यक्रमांची जंत्री
नवरात्रोत्सव काळात दररोज शाळेच्या प्रार्थनेवेळी देवीची आरती घेतली जाते. आरतीचा मान वेगवेगळ्या वर्गांना दिला जातो. आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. देवीच्या पूजेचे साहित्य, हार-फुले यांची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वाटून घेतात. काही शाळांमध्ये नऊ देवींची माहिती पालक व विद्यार्थ्यांना दिली जाते. विशेष दिवशी स्पेशल गरबा खेळला जातो, जिथे विद्यार्थी व शिक्षक नटूनथटून दांडिया खेळतात.
.............
भोंडल्याची मजा
नांदगाव येथील संत नामदेव विद्यालयात भोंडला किंवा हादगा उत्साहात पार पडतो. यावेळी विद्यार्थी डब्यातील खाऊ एकत्र बसून खातात आणि भोंडल्याची गाणी गातात. यामुळे एकोप्याची जाणीव मुलांना मिळते.
...............
खाऊवाटप व सांस्कृतिक रंग
काही शाळांमध्ये पालक व समाजसेवक मुलांसाठी खाऊची व्यवस्था करतात. लाडू, बुंदी, भेळ अशा पदार्थांचा विद्यार्थ्यांना आस्वाद मिळतो. महिला शिक्षिका नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून उत्सवात रंग भरतात. आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्येही हा उत्साह दिसून येतो.
.............
संस्कृतीबरोबर अभ्यासालाही प्राधान्य
आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल-माणगावचे मुख्याध्यापक अमोल जंगम यांनी सांगितले की, नवरात्रोत्सव हा फक्त पूजेपुरता मर्यादित नसून अभ्यासाबरोबर मनोरंजन व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित होतात. राजिप शाळा नेणवलीचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले की, हा उत्सव गावातील महिला, पालक व शाळेला एकत्र आणतो. शक्तीचे प्रतीक, रंगांचे महत्त्व आणि शिक्षणाची जोड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.