उल्हासनगरात मिरवणुकीमुळे कोंडी
मंडळावर वाहतूक ठप्प केल्याचा आरोप : गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : दुर्गामातेच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुकीमुळे उल्हासनगरमध्ये भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहर भक्तिभावात न्हाऊन निघाले; मात्र या मिरवणुकीचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. सुमारे तीन तास उल्हासनगर शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे सामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, रुग्णवाहिका अशा अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अखेर पोलिसांनी कारवाई करत सागर उटवाल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर उटवाल यांच्यावर वाहतूक ठप्प केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर शहरात शनिवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहा वाजता गोल मैदानातून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालू राहिली. मूर्तीच्या स्वागतासाठी सजवलेली वाहने, मोठ्या संख्येने जमलेले भाविक, ढोल-ताशांचे पथक आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोंडीत अडकलेले, वाहनचालक हॉर्न वाजवत होते. कामावरून घरी परत येत असलेल्या नोकरदारवर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला. रुगवाहिकांनादेखील ताटकळत राहावे लागले. या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. अनेकांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली.
पोलिस शिपाई बाबासाहेब पोटे यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सागर उटवाल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर उटवाल व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीत वाहतुकीची योग्य योजना आखून ती काटेकोरपणे राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांनीदेखील अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी परवानगी देताना वाहतूक व्यवस्थेची खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.