तिसऱ्या डोळ्याची नजर
पनवेलमध्ये नवीन वर्षापासून १,३४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
खारघर, ता. २२ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, गाव-शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनाही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने १७५ कोटी रुपयांचा प्रकल्प राबवून परिसरात १,३४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्यांमध्ये चेहरा ओळखणारी, वाहनांची संख्या व गती तपासणारी, तसेच नंबर प्लेट ओळखणारी यंत्रणा असेल. तसेच गुन्हेगारी संदर्भातील नोंदी डिजिटल स्वरूपात साठवण्यात येतील. हे कॅमेरे शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मुख्य रस्ते आणि शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर बसवले जातील.
पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि पोलिस आयुक्तांनी एकत्र येऊन या प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. कॅमेरे लावण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन असून, नवीन वर्षापासून हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत ८३१ ठिकाणी स्थिर कॅमेरे, ११० ठिकाणी फिरणारे कॅमेरे, १०० ठिकाणी वाहनांच्या नंबर प्लेट वाचनासाठी कॅमेरे आणि ७८ ठिकाणी सर्वदृष्टीने दिसणारे कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कामासाठी “ऑरियनप्रो सोल्यूशन्स लिमिटेड” या संस्थेला जबाबदारी देण्यात आली असून, या संस्थेच्या सहकार्याने तीन वर्षे हा प्रकल्प चालविला जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात तळोजा, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल या सिडको वसाहतीसह पनवेल तालुक्यातील २९ महसुली गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पालिका हद्दीतील बहुतांश ग्रामीण भाग शहरांना जोडले गेले आहेत. तसेच शहरीकरणामुळे मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. यामुळे लोकसंख्येत भर पडत आहे. त्यामुळेच गाव आणि शहरातील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी पालिका हद्दीतील बाजारपेठ, वर्दळीची ठिकाणे, विविध सिग्नल, पोलिसांनी निवडलेले महत्त्वाचे चौक, मुख्य रस्ते आणि पालिका हद्दीतील प्रवेश करणारे सर्व रस्ते, अशा विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालय आणि पोलिस ठाण्यात दोन नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. पनवेल परिसरात सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, विशेषत: मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, असे महापालिकेने सांगितले आहे.
महिला, मुली आणि नागरिक सुरक्षित राहावेत, तसेच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रात १,३४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. पोलिस व पालिकेच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही ठिकाणे ठरवण्यात आली असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण करून नवीन वर्षात प्रकल्प सुरू केला जाईल.
- कैलाश गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका
योजनेचा उद्देश
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे
महिला आणि मुलींच्या सुरक्षेची हमी
वाहन चोऱ्या, अपघात, छेडछाड अशा घटनांना आळा घालणे
शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवणे
प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर
........................
फिक्स्ड कॅमेरे - ८३१
पॅन-टिल्ट-झूम कॅमेरे -११०
नंबर प्लेट ट्रॅकिंग कॅमेरे- १००
पॅनोरॅमिक कॅमेरे - ७८
एकूण कॅमेरे – १,३४३
.....................
तांत्रिक उपकरणे
खांब (पोल)- ४८८
आयपीपीए प्रणाली - ३६०
पोर्ट बदलणारी यंत्रणा (स्विचेस)- ३८९८
विद्युत जंक्शन पेट्या - ३९०
दिवे (फ्लडलाइट्स)- ४६
मॉनिटर्स - १२
स्थानके (वर्क स्टेशन) - ६
बॅटरी बॅकअप यंत्रणा (युपीएस)- ६
डेकोडर्स - ६
वातानुकूलक यंत्रणा (एसी)- १२
..................................
कॅमेरे कुठे बसवले जाणार?
महत्त्वाचे चौक व सिग्नल पॉइंट्स
बाजारपेठा, वर्दळीची ठिकाणे
शाळा, महाविद्यालये, कार्यालयांजवळ
शहरात येणारे व जाणारे सर्व मुख्य रस्ते
पोलिसांकडून ठरवलेल्या संवेदनशील ठिकाणी
..................................
-