नवमतदारांच्या हक्कांवर गदा
१ जुलैपर्यंतची नोंदणी ग्राह्य, उमेदवारांचे गणित फिसकटणार
पनवेल, ता. २७ (बातमीदार)ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीत १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेले मतदारच मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. पण नुकतीच १८ वर्षे पूर्ण केलेल्या अनेक तरुण मतदारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी पूर्ण केली आहे. पण निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याने नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने कार्यक्रम निश्चित केलेला आहे. पंचायत समितीनंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी रंगणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण आहेत. त्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत पंचायत समिती गणाच्या सर्व मतदार याद्या निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर आरक्षण सोडत होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. पालिका निवडणुकीच्या मतदारांनासुद्धा मतदान नोंदणीसाठी तीच अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. पण अनेक मतदारांनी १ जुलै २०२५नंतर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी केली आहे. आयोगाच्या नियमांनुसार मात्र मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
------------------------------
निवडणूक आयोगाची लक्ष्मणरेषा
- पनवेल महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर होणार असली तरी १ जुलैपर्यंत नोंदणी झालेले मतदारच प्रभागामध्ये मतदान करू शकतील. त्यानंतर नोंदणी झालेल्यांना मतदान करता येणार नाही.
- नेमकी मतदार नोंदणीची अंतिम तारीख काय? जर आता नवीन मतदार नोंदणी केली तर मतदार यादीमध्ये नाव येईल का, असे अनेक प्रश्न पालिका क्षेत्रातील इच्छुकांना पडले होते. मात्र निवडणूक विभागाने दिलेल्या १ जुलै २०२५ या लक्ष्मण रेषेमुळे धावपळ करूनही नवीन मतदारांची मते मिळवता येणार नाहीत.
----------------------------------------------
नोंदणी मोहीम राबवा
पनवेल महापालिका निवडणुकीत अनेक तरुण मतदार १८ वर्षांचे झाले आहेत. नुकतीच लग्नसराई झाली आहे. अनेक नववधूंची नावे नोंदवण्याचा मानस विविध राजकीय पक्षांमधील उमेदवारांचा आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी पूर्ण केली आहे, त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे नवमतदारांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नोंदणी मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.
-------------------------------
१ जुलैनंतर मतदार नोंदणी बंद झाल्याने अनेक तरुण मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. पुढच्या निवडणुकांसाठी अशा तरतुदी आधीच जाहीर व्हाव्यात, जेणेकरून इच्छुकांना नोंदणी करता येईल.
- श्रीकांत फाळके, भावी उमेदवार, रोडपाली
--------------------------------
मतदार नोंदणीची अंतिम तारीख ही राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेली आहे. १ जुलैनंतर नोंदणी झालेल्या मतदारांची नावे या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. मात्र पुढील पुनरावलोकनात त्यांचा समावेश केला जाईल.
- संभाजी शेलार, नायब तहसीलदार, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.