सापगांव, सावरोली पुलाला तडे
शहापूर तालुक्यात जनजीवन विस्कळित
शहापूर, ता. २९ (वार्ताहर) : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. भातसा आणि तानसा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील भातसा नदीवरील सापगांव, साजिवली आणि तानसा नदीवरील सावरोली हे तीन पूल पाण्याखाली गेले होते. सोमवारी (ता. २९) पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुलांची दुरवस्था स्पष्ट झाली असून, वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सावरोली पुलाला तडे गेले असून, सापगांव येथील पूल कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आले आहे. साजिवली, सावरोली आणि सापगांव पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार सावरोली पुलाची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे, साजिवली पुलाचीदेखील दुरुस्ती करावी लागणार आहे. भातसा नदीवरील सापगांव पुलाच्या दुरुस्तीचीही गरज असल्याचे नमूद करण्यात आले.
रविवारी पाण्याखाली गेलेले पूल सोमवारी उघडकीस आले तेव्हा सावरोली पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे आढळले. साजिवली पुलाची दुरुस्ती आवश्यक असून, सापगांव पुलाचा कठडा तुटून पडला आहे.
पुलावरील डांबर आणि काँक्रीटचे भाग पुराच्या पाण्याने उखडले गेले आहेत. प्रशासनाने या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मागणीनुसार वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे, कारण हा मार्ग शेकडो गावांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे.
सापगांव पूल पाण्याखाली जाण्याआधीच खड्ड्यांत गेला होता, त्यामुळे त्यावरून वाहन चालवणे धोकादायक होते. या पुलाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण बांधकाम गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी अनेक आंदोलने केली, मात्र रस्ते विकास महामंडळाकडून अद्याप योग्य प्रतिसाद नाही. सापगांव पुलाच्या दुरवस्थेमुळे रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे आणि येथील रहिवाशांना मोठी अडचण भासत आहे.
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मागणीनुसार सापगांव पुलावरील वाहतुकीस हिरवा कंदील देण्यात आला आहे. पुलाच्या दुरवस्थेची पाहणी केली असून, कठड्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डे भरून घेण्याचे काम सुरू आहे.
- सिद्धार्थ वाहुले, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ