बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : बदलापूरपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील ढवळेपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची नवीन इमारतीचे बांधकाम आठ ते नऊ महिन्यांपासून पूर्ण झाले आहे. मात्र, त्याचे उद्घाटन अद्याप झाले नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा अजूनही जुन्या, गळक्या इमारतीत भरवली जात आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अजूनही शाळेची नवीन इमारत शाळेला हस्तांतरित झाली नसल्याने, येथील ग्रामस्थ जयेश केवणे यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली आहे.
ढवळेपाडा गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरवले जाते. एकूण ११ विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे शाळेच्या आवारात जिल्हा परिषदेने २० लाखांचा निधी मंजूर करून नवीन इमारत उभी केली. ही इमारत बांधून जवळपास आठ ते नऊ महिने पूर्ण झाले आहेत. जुन्या इमारतीच्या वर्गात अंधारमय खोली आहे. छपरावरील पत्रे तुटलेली आहेत. पावसात वर्गात पाणी झिरपते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन इमारत बांधण्यात आली होती; मात्र उद्घाटनाच्या उशीरामुळे विद्यार्थ्यांना अजूनही गळक्या इमारतीतच धडे गिरवावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ जयेश केवणे यांनी केला आहे.
केवणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रुप ग्रामपंचायत ढवळे-कुडसावरे, जिल्हा परिषद ठाणे तसेच खासदार व स्थानिक आमदार यांच्याकडे अर्जाद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी नवीन शाळेचे उद्घाटन लवकरात लवकर करावे. नव्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, विद्युत सुविधा सुरू करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, निधी मंजूर होऊन करप्रणालीबाबत प्रक्रिया होऊन दिलेल्या कालावधीत काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे या कामाची चौकशी आणि संबंधित ठेकेदाराला शासकीय दंड लावावा, अशी मागणी पत्राद्वारे संबंधित प्रशासनाला केली आहे. दरम्यान, जयेश केवणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. यंदा पावसाळा अधिक झाल्याने शाळेच्या नव्या इमारतीतील इतर तांत्रिक काम करण्यास अवधी लागला आहे. यामुळे नव्या इमारतीत शाळा सुरू करण्यास उशीर लागला असल्याचे प्रभारी सरपंच, तसेच इतर ग्रामस्थांनी सांगितले.
ठेकेदारांनी दिलेल्या अवधीत काम पूर्ण केलेले नाही. या संदर्भात शाळा प्रशासनाला सांगूनही लक्ष दिलेले नाही. ग्रामपंचायतीनेही या प्रकरणात आवाज उठवलेला नाही. त्यामुळे या कामासंदर्भात सखोल चौकशी व्हावी, यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे. यानंतर शाळा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, तक्रारदार असूनही बैठकीला बोलवले नाही. फक्त उद्घाटनाचा दिखावा करण्यासाठी शाळेतील मुलांना जुन्या इमारतीत बसवले जात आहे. मुलांना जीर्ण व गळक्याच्या इमारतीत बसवणे योग्य नाही. या प्रकरणाची शासनस्तरीय सखोल चौकशीची मागणी करत आहे.
- जयेश केवणे, ग्रामस्थ, ढवळेपाडा, वांगणी
शाळा नियोजन समितीची ३० सप्टेंबरला बैठक घेण्यात आली होती. यावेळी ठाण्याहून सरकारचे अभियंते उपस्थित होते. त्यांनी सोमवारपर्यंत शाळेतील तांत्रिक आणि विद्युत सुविधांचे काम पूर्ण करून सोमवारपासून नवीन इमारतीत शाळा सुरू केली जाईल, असे सांगितले. आठ ते नऊ महिन्यांपासून शाळा तयार असली तरी शाळेचे नाव इमारतीवर टाकलेले नाही. तसेच पावसाळ्यामुळे उद्घाटन करता येत नव्हते, यामुळे नव्या इमारतीसाठी उशीर झाला.
- अश्विनी केवणे, प्रभारी सरपंच, ढवळेपाडा-कुडसावरे
बदलापूर : ढवळेपाडा शाळेची जुनी इमारत.
बदलापूर : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली ढवळेपाडा शाळेची नवी इमारत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.