नवी मुंबईच्या विमानतळाहून डिसेंबरपासून प्रवासी सेवा
उद्घाटनानंतर सीआयएसएफ ताबा घेणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिसेंबर महिन्यापासून प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू होतील, अशी माहिती आज (ता. ४) सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. उद्घाटनानंतर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी सुमारे ४५ दिवस हे विमानतळ सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
विमानतळाचा ताबा घेऊन येथे कमांडर आणि एसआय पातळीवरील अधिकारी तैनात केले जाणार आहेत. सुरक्षाविषयक उपकरणे, स्क्रीनिंग आणि स्कॅनिंग मशीन, मेटल डिटेक्टर इत्यादी यंत्रणा बसवून चाचपणी करण्यासाठी सुरक्षा दलांना ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उद्घाटनानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा डिसेंबर महिन्यात वापरता येणार आहे. दरम्यान, साधारणतः १९७०च्या दशकात या विमानतळाची घोषणा झाली तेव्हापासून आजपर्यंत विमानतळाची विविध कामे भूसंपादनासहित गावे स्थलांतरित करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, गावांचे पुनर्वसन, भराव टाकणे, नदीचा प्रवाह बदलणे इत्यादी कामे ज्या सनदी अधिकाऱ्यांच्या काळात पूर्ण झाली अशा सर्व अधिकाऱ्यांना विमानतळाच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले असून, या सर्वांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.
...
सर्वप्रथम मोदींचे विमान उतरणार
विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान उतरणार आहे. या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी दिल्यानंतर दुसऱ्या विमानाला सलामी मिळेल. मोदी विमानतळावर आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील. काही दिवसांपूर्वी धावपट्टीवर विमान उतरण्याबाबतची चाचणी हवाई दलातर्फे घेण्यात आली आहे.
...
या कंपन्यांची सेवा मिळणार
सिडको आणि अदाणी उद्योग समूहातर्फे एनएमआयएएल या कंपनीची विमानतळ चालवण्यासाठी भागीदारीत स्थापना झाली आहे. या कंपनीचे इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्यांसोबत विमानसेवा देण्यासाठी करार झाला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात नवी मुंबई विमानतळाहून याच कंपन्यांच्या सेवा प्रवाशांना मिळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.