पनवेल प्रशासकीय भवन दुरवस्थेत
तत्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा!
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले प्रशासकीय भवन सध्या अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या इमारतीत येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश आले असून, या समस्येवरून नागरिक संतप्त झाले आहेत. या दुरवस्थेबद्दल शिवसेना पनवेल महानगर जिल्हा शाखेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी उपविभागीय (प्रांत) अधिकारी, पनवेल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला आहे.
सोमण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या प्रशासकीय इमारतीच्या दुरवस्थेबद्दल निषेध नोंदवला. या इमारतीचा मूळ उद्देश शासनाची तालुका स्तरावरील महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली आणून नागरिकांना सुविधा देणे होता. परंतु, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महसूल खात्याकडे हस्तांतरित होताच या भवनाची स्थिती द्रुतगतीने खालावत गेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, इमारतीतील अस्वच्छ प्रसाधनगृहे, बंद लिफ्ट, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, अस्वच्छता, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता या समस्या गंभीर असून नागरिकांच्या सुविधा अधिकाराला धक्का पोहोचवतात. एका बाजूला पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असताना, दुसऱ्या बाजूला प्रशासकीय भवनाची ही अवस्था तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अपमानास्पद असल्याचे शिवसेनेने ठळकपणे म्हटले आहे.
शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ३० सप्टेंबर २०२५ रोजी या इमारतीच्या स्वच्छतेची आणि इतर सुविधा कोणाची जबाबदारी आहे, याची माहिती मागितली होती. यासंदर्भात अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे सोमण यांनी तत्काळ कार्यवाही करून या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच, इमारतीतील प्रस्तावित शासकीय कार्यालयांचे स्थलांतर कधी होईल, याची स्पष्ट माहिती देण्याचीही विनंती त्यांनी केली आहे.
..................
शिवसेनेच्या निवेदनात इशारा देण्यात आला आहे की, तत्काळ कार्यवाही न झाल्यास इमारतीजवळ कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या वेळी शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, संघटक अभिजित साखरे, उपशहर संघटक खंडेश धनावडे, सिद्धेश पवार, विजय जाधव, गणेश वाघिलकर, महेश गाडगीळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.