ऐरोली नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात
लवकरच तिसरी घंटा वाजणार
वाशी, ता. ५ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यामातून नाट्यगृह बांधण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे भूमिपूजन होऊन जवळपास ११ वर्षांचा काळ झालेला आहे. आता ऐरोली नाट्यगृहाची इमारत उभी राहिली आहे. अंतर्गत कामे सुरू असून, नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षाअखेरपर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण होणार असून, नूतन वर्षात नाट्यगृहाचे कर्तव्य पार पडणार आहे. नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई परिसराचा विकास करताना सिडकोमार्फत सुरुवातीला वाशी, बेलापूर, नेरूळ, तुर्भे हे नोड विकसित करण्यात आले. त्यामुळे नागरी सोयी सुविधा पुरविताना नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर नवी मुंबईचा दिघ्यापर्यंत झालेला विस्तार व नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहराच्या कोपरखैरणेपासून पुढील भागातील नागरिकांसाठी मनोरंजनासाठी हक्काचे ठिकाण असावे, अशा प्रकारची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. त्यामुळे २०१४च्या विधानसभा व पालिका निवडणुका लक्षात घेत २४ जुलै २०१३ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने नाट्यगृहासाठी प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडून मे. महावीर रोड्स अँड इन्फा. प्रा. लि. यांना २० ऑगस्ट २०१४ रोजी कंत्राट देण्यात आले. त्यावेळी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. पण टेकेदाराने आर्थिक विवंचनेचे कारण देत काम केले नाही.
जवळपास सहा वर्षे या नाट्यगृहाचे काम रखडले होते. पण तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या नाट्यगृहाची नव्याने निविदा प्रक्रिया करून काम मार्गी लावले आहे. या नाट्यगृहाचे काम हे जुलै २०२१ मध्ये सुपर कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. आता रखडलेल्या या नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नाट्यगृहाची चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामधील अंतर्गत कामे आता करण्यात येत आहेत. या नाट्यगृहासाठी ७० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ऐरोली नाट्यगृह झाल्यांनतर दिघा, ऐरोली, घणसोलीमधील नाट्यरसिकांची होणारी फरपट थांबणार आहे. नाट्यगृहाचे काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी विशेष लक्ष दिले आहे. ऐरोली नाट्यगृहाचे काम जलदगतीने सुरू असून, नूतन वर्षात नाट्यगृह सुरू होईल. हे नाट्यगृह सर्व सुविधांनी संपन्न असेल, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली.
नाट्यगृहाची रचना
पहिले तळघर - कार पार्किंग
दुसरे तळघर - कार पार्किंग
तळमजला - तिकीटघर, प्रसाधनगृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार
पहिला मजला - सौंदर्य प्रधानगृह, प्रसाधनगृह अपंगाकरिता, उपहारगृह
दुसरा मजला - ग्रीन रूम, प्रशासकीय दालन, बहुउद्देशीय सभागृह
तिसरा मजला - अधिकारी कक्ष, अतिथीगृह, उपाहारगृह
चौथा मजला - विशेष अतिथीगृह, अधिकारी कक्ष
आसन व्यवस्था
ऑर्केस्टा आसनव्यवस्था - ४७४
दिव्यांगांची आसनव्यवस्था - ४
बाल्कनी आसनव्यवस्था - ३८२
एकूण - ८६०