पर्यटन हंगामाचा शुभारंभ
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला; दिवाळीसाठी सज्ज
मेघराज जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मुरुड, ता. ६ : रायगडमधील पर्यटनाला मेपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच फटका बसला आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर ऐतिहासिक वास्तू असलेला जंजिरा किल्ला रविवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने नव्या हंगामासाठी पर्यटन नगरी सज्ज झाली आहे.
मुरूड येथील जंजिरा किल्ला पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला हातभार लागत असतो. मुरूडच्या पर्यटन व्यवसायामध्ये ऐतिहासिक जलदुर्ग जंजिरा, पद्मदुर्ग मुख्य आकर्षण मानले जाते. पावसाच्या कालावधीत पुरातत्त्व विभागाने जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला होता. दरवर्षी १ सप्टेंबर पासून हा किल्ला खुला करण्यात येतो, पण सातत्याने बिघडणाऱ्या वातावरणामुळे यंदा किल्ल्यावर जाणे शक्य नसल्याने ५ ऑक्टोबरपासून किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. याचबरोबर मुरूडचा पद्मदुर्ग, अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याही पुरातत्त्व विभागाने सुरू केला असून, प्रशासनाने दिवाळी सुट्टीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.
----
वातावरण बदलांचा फटका
साधारण ६ जूनपासून सुरू होणाऱ्या मॉन्सूनपूर्वी जूनच्या १ तारखेपासून किल्ल्यात प्रवेश बंद केला जातो. यंदा मात्र मेच्या दुसऱ्याच आठवड्यात पाऊस पडू लागल्याने किल्ल्यात जाणारी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत बंद राहणारा किल्ला साधारणपणे १ सप्टेंबरपासून खुला करण्यात येतो, परंतु यंदा हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे.
--------------------------------
२०० कुटुंबे निर्भर
स्थानिक लॉजिंग, हॉटेलिंग, स्टॉलधारक, घरगुती खाणावळचालक यांची मदार पर्यटकांवरच अवलंबून असते. महत्त्वाचे म्हणजे जंजिरा पर्यटक संस्थेच्या १३ शिडाच्या बोटी, दोन इंजिन होड्यांवर अवलंबुन असणारे सुमारे २०० कुटुंबे प्रवासी वाहतुकीवर निर्भर आहेत. त्यामुळे पर्यटकांवरच रोजीरोटी अवलंबुन असल्याचे प्रभारी व्यवस्थापक मोअज्जम कादीरी यांनी सांगितले.
-----------------------------------
साफसफाई करण्याची मागणी
जिल्ह्यातील सर्वच गडकिल्लांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे, रानगवत, वेली वाढलेल्या असतात. यासाठी पुरातत्त्व विभाग पर्यटकांकडून जमा होणाऱ्या प्रवेश शुल्कातून स्वच्छतेसाठी निधी खर्च करते, परंतु अद्यापही किल्ल्याची स्वच्छता सुरू झालेली नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने युद्धपातळीवर साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
----
जंजिरा, पद्मदुर्ग पर्यटकांचे आकर्षण
स्थानिक लॉजिंग, हॉटेलिंग, स्टॉलधारक, घरगुती खाणावळचालक यांची मदार पर्यटकांवरच अवलंबून असते आणि महत्त्वाचे म्हणजे जंजिरा पर्यटक संस्थेच्या १३ शिडाच्या बोटी व दोन इंजिन होड्यांवर अवलंबून असणारे सुमारे २०० कुटुंबे सर्वस्वी किल्ल्यातील प्रवासी वाहतुकीवर निर्भर आहेत. मुरूडच्या पर्यटन व्यवसायामध्ये ऐतिहासिक जलदुर्ग जंजिरा आणि पदम दुर्ग हे प्रमुख आकर्षण मानले जातात.
-----------------------
जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे, परंतु लहान मुले, वयोवृद्धांना होडीतून प्रवास करताना अडचणी येतात. अनेकवेळा अपघातदेखील झालेले आहेत. त्यामुळे जेट्टी बांधण्याची अनेक दिवसांची मागणी होत होती. काही दिवसांतच येथे बांधलेल्या जेट्टीचे लोकार्पण होईल, असे फोरकॉन इन्फ्रा कंपनीचे सीईओ अजय सांगळे यांनी सांगितले.
------------------------
प्रवेश शुल्क
प्रौढ व्यक्ती २५
१५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना मोफत.
--------------------------
प्रवासी वाहतूक
प्रति प्रवासी १००
१२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये शुल्क.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.