आरोग्य धोक्यात! कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाच्या ‘ढिसाळ कारभारा’मुळे
टिटवाळा, वार्ताहर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) कार्यक्षेत्रातील अ प्रभागात येणार्या सावळाराम नगर २, शिवसाई रोड, दुबे कॉलेजच्या मागील बल्याणी टेकडी परिसरात कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. पालिकेचा ढिसाळपणा आणि स्थानिकांच्या तक्रारींकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे हा संपूर्ण परिसर अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. कचऱ्याच्या या डोंगरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यांचे जीवन नरकासमान झाले आहे.
केवळ ‘दिखावा’: जेसीबी येते, कचरा उचलत नाही!
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात आठवड्यातून फक्त एकदाच जेसीबी येते, मात्र ही जेसीबी प्रत्यक्षात कचरा उचलत नाही, तर केवळ रस्त्यावर पडलेला कचरा बाजूला सरकवून निघून जाते. ही कृती म्हणजे महानगरपालिकेचा ‘दिखावा’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘महानगरपालिका फक्त दिखावा करते; जेसीबी येते पण कचरा उचलत नाही. रोज दुर्गंधीने जगणं कठीण झालंय,’ असे एका स्थानिक महिलेनं सांगितलं.
रोगराईचे मोठे आव्हान
शिवसाई रोड परिसरात साचलेला प्लॅस्टिक, ओला कचरा, घरगुती अवशेष आणि वैद्यकीय कचरा यांचा मोठा साठा तयार झाला आहे. हा कचरा आणि त्यातून येणारी तीव्र दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात या कचऱ्यातून दूषित पाणी वाहते, जे आसपासच्या गल्लीतील नाल्यांमध्ये मिसळून डास, कीटक आणि रोगराईचा धोका वाढवत आहे.
पालिकेच्या दुर्लक्षावर स्थानिकांचा संताप
या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. एका बाजूला पालिकेने उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड ठोठावण्यासाठी परिसराच्या प्रवेशद्वाराजवळच फलक लावला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्याची तंबी दिली आहे (पहिल्या फोटोत दिसणारा फलक), तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणाच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याचे भयानक चित्र आहे.
या निष्काळजीमुळे केवळ पर्यावरणीय हानीच नाही, तर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) कचरामुक्त शहरासाठी ‘चन्नई पॅटर्न’सारख्या महत्त्वाकांक्षी योजना आखत असताना, सावळाराम नगरसारख्या भागात स्थानिक प्रशासन मूलभूत स्वच्छतेतही अपयशी ठरत असल्याचे हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.
नागरिकांनी तातडीने या ठिकाणी मोठी स्वच्छता मोहीम राबवून कचरा व्यवस्थापनाची पक्की उपाययोजना करण्याची आणि कचरा उचलण्यासाठी नियमित यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रश्नावर पालिका प्रशासन तातडीने काय पाऊल उचलते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.