भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडीतील कल्याण रोड परिसरातील खासगी रुग्णालयात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग झाल्याने एका महिला रुग्णाला अपंगत्व आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ठाणे जिल्हा रुग्णालयाने यासंदर्भात दाखला देऊनही आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही, भिवंडी पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयावर आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. या रुग्णालयाच्या नोंदणीची मुदत मार्च २०२५ मध्येच संपली असतानाही, तेथे राजरोसपणे उपचार सुरू असल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने थेट पालिका आयुक्तांकडे केली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार उघड झाला आहे.
सबीया फहीम अख्तर अन्सारी असे अपंगत्व आलेल्या महिलेचे नाव आहे. एका अपघातानंतर सबीया यांना कल्याण रोड येथील हील लाईफ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या औषधोपचारात रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे संसर्ग वाढला. या कारणामुळे सबीया ४० टक्के अपंग झाल्याचा दाखला ठाणे जिल्हा रुग्णालयाने दिला आहे. संसर्ग वाढल्याने सबीया यांना मुलुंड येथील डॉ. मितेन शेठ यांच्याकडे उपचारांसाठी जावे लागले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या गुडघ्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेमुळे सबीया आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
पीडित महिलेचे पती फहीम अन्सारी यांनी या गंभीर प्रकाराबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांना निवेदन दिले आहे. हील लाईफ हॉस्पिटलवर आठ दिवसांच्या आत सील करण्याची कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. आयुक्त अशा गंभीर प्रकरणातील रुग्णालयावर काय कारवाई करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हिल लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
रुग्णालयाविरोधात दोषारोपपत्र दाखल
सबीया यांच्या पतीने याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे सिव्हिल सर्जन, ठाणे यांच्या अभिप्रायासाठी पाठवली. सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून, रुग्णाने केलेली तक्रार बरोबर असून, हील लाईफ रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रथमदर्शनी हलगर्जीपणा दिसून येत आहे, असा स्पष्ट अभिप्राय दिला. या अहवालाच्या आधारावर भिवंडी शहर पोलिसांनी रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांविरोधात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे आणि मे. न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
मुदतीनंतरही रुग्णालय सुरू
सिव्हिल सर्जनचा अहवाल, पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊनही, भिवंडी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आजपर्यंत रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे, या रुग्णालयाला पालिकेने दिलेली नोंदणी ३१ मार्चलाच समाप्त झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पालिकेने अद्याप त्याचे नूतनीकरण केलेले नाही. तरीही हे रुग्णालय राजरोसपणे सुरू आहे.
भिवंडी महापालिकेमार्फत हिल लाईफ रुग्णालयाला दिलेल्या नोंदणीची मुदत मार्चमध्ये संपली आहे. पुढील मुदतवाढीसाठी पालिकेने स्थगिती दिली आहे. तसेच, या रुग्णालयातील वैद्यकीय सेवाही स्थगित करून रुग्ण प्रवेशाला मनाई केली आहे. रुग्णालयातील डाॅ. जितेंद्र निकुंभ, डाॅ. शाहिद खान व डॉ. संतोष यादव यांच्याविरोधात महाराष्ट्र मेडिकल काॅन्सिल यांना कळवून त्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी पालिकेने कळविले आहे.
- डाॅ. संदीप गाडेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
भिवंडी महापालिका