मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ७ : बदलापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेतील, सानेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तीन वर्षांपासून एक गंभीर आणि गलिच्छ समस्या ठाण मांडून आहे. मध्य रेल्वेच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या या ठिकाणी कोरोनाकाळापासून कचऱ्याचा ढीग साचू लागला आहे. आता ही जागा अनधिकृत कचराकुंडीसह सार्वजनिक लघुशंकेचे घर बनले आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी आणि रमेशवाडीला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर भर बाजारामध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. याहूनही वाईट म्हणजे, या घाणीच्या ढिगातच पुरुष वर्ग लघुशंकेसाठी गर्दी करत असल्याने परिसरातील दुर्गंधीने कळस गाठला आहे. या घाणीचा आणि उघड्यावर लघुशंकेसाठी येणाऱ्या पुरुषांचा सर्वाधिक त्रास येथील दुकानदार आणि रिक्षाचालक; तसेच महिलांना होत आहे. रिक्षांच्या रांगा लागत असल्याने उभ्या असलेल्या महिला रिक्षाचालकांना या प्रकारामुळे मोठा त्रास होतो. यामुळे अनेकदा वाद आणि भांडणेही होतात. दिवसभर येणाऱ्या दुर्गंधीमुळे दुकानदार आणि रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
दुकानदार आणि रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांपासून ही कचराकुंडी आहे त्याच अवस्थेत आहे. भर बाजारात अगदी पदपथावर तयार झालेल्या या कचराकुंडीकडे पालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वारंवार तक्रार करूनही दोन वर्षांपूर्वी एकदाच स्वच्छता झाली. त्यानंतर या घाणीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. भर बाजारात अगदी पदपथावर तयार झालेल्या या घाणीमुळे येथील पदपथ पूर्णपणे हरवून गेला आहे.
दंडात्मक कारवाईची मागणी
या गंभीर स्थितीमुळे त्रस्त झालेल्या दुकानचालक, रिक्षाचालक आणि महिला वर्गाने तातडीने ही घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेसाठी येणाऱ्या पुरुष वर्गावर पालिकेने तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
रेल्वेने बांधलेली भिंत या ठिकाणी डम्पिंगसाठी कारण बनली आहे. बदलापुरात रेल्वे येताच उतरणारे प्रवासी येथे लघुशंकेसाठी गर्दी करतात. त्यामुळे परिसरात सतत अस्वच्छता पसरते. सकाळी आणि संध्याकाळी ही गर्दी व दुर्गंधी इतकी तीव्र होते की दुकाने चालवणाऱ्यांनाही परिसरात बसता येत नाही. यामुळे ग्राहकांवरही परिणाम होत आहे. पालिका प्रशासनाकडे सतत तक्रार केल्या असूनही, लक्ष दिले जात नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.
- आकाश कोठारी, दुकानचालक
शहरातील मुख्य बाजारपेठेतील महत्त्वाचे ठिकाण रेल्वेमार्गाच्या बाजूला आहे. येथे रेल्वेने संरक्षक भिंत बांधली असून, भिंतीपल्याड दुकाने आहेत. याच मधल्या भागात कचराकुंडी तयार झाली आहे, तर समोर रिक्षांच्या मोठ्या रांगा लागतात. यात महिला रिक्षाचालकही असतात आणि महिला प्रवाशांनाही या घाणीचा त्रास सहन करावा लागतो. ही कचराकुंडी दिवसागणिक वाढत असून, संपूर्ण पदपथ कचऱ्याने व्यापला आहे. सायंकाळच्या वेळेत लघुशंकेसाठी पुरुष वर्ग येथे गर्दी करतो. दुकानदार आणि नागरिकांच्या तक्रारीनुसार, पालिका प्रशासनाने ताबडतोब कारवाई करून कचराकुंडी हटवावी आणि लघुशंकेसाठी येणाऱ्या पुरुषांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.
- सचिन पांडव, दुकानचालक
पालिका करणार दंडात्मक कारवाई
ही जागा खासगी मालमत्ता असल्याची सध्यातरी माहिती मिळत आहे. संपूर्ण जागा पडीक आणि आतल्या बाजूला असल्याने येथे स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे या ठिकाणी कचरा व दुर्गंधीचा त्रास वाढला होता. मात्र, आता पालिका प्रशासनाने स्वच्छतेचे नियोजन करून ही जागा साफ करण्याचे ठरवले आहे. या ठिकाणी लघुशंका करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच या ठिकाणी “येथे लघुशंका केल्यास दंड होईल” असा फलक लावला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.