काशिमिरा येथे १२९ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
कल्याण (वार्ताहर) ः काशिमिरा येथील कम्युनिटी हॉलमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे रविवारी (ता. ५) आयोजन केले होते. या शिबिरात १२९ निरंकारी भक्तांनी उत्साहाने रक्तदान केले. या रक्तदान मोहिमेत अनेक पत्रकार बंधूही सहभागी झाले होते. रक्तसंकलन संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्लेमार्फत करण्यात आले. महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी अनेक मान्यवर, मंडळाचे प्रबंधक आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी संत निरंकारी मिशनच्या निष्काम मानवसेवेचे कौतुक केले. स्थानिक मुखी अरविंद मोरे यांनी स्थानिक सेवादल युनिट आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीपणे पार पाडले. या रक्तदान शिबिरामुळे रक्तसंकल्पनामध्ये मोठा हातभार लागला असून मानवतेच्या सेवेत निरंकारी भक्तांनी आपली जबाबदारी उत्कृष्टपणे बजावली आहे.
..............................
महावितरणची आधुनिक मीटर चाचणी प्रयोगशाळा कार्यरत
कल्याण (वार्ताहर) ः कल्याण परिमंडळात महावितरणच्या मीटर चाचणी विभागात अत्याधुनिक संगणकीकृत प्रयोगशाळा सुरू झाली आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी या चाचणी बेंचचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेमध्ये स्मार्ट मीटरची अचूकता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. यामुळे वीज वितरण प्रणालीतील गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढेल. प्रयोगशाळेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन वेळ आणि संसाधनांची बचत होईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना अचूक वीज वापराची माहिती मिळेल आणि गुणवत्तापूर्ण मीटरिंग प्रणाली विकसित होण्यास मदत होईल. कार्यकारी अभियंता (चाचणी) विभागाने या प्रयोगशाळेच्या कार्यान्वयनासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. या वेळी मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंता (चाचणी) मंदार अत्रे, अनिल थोरात, विजय फुंदे, मोहन काळोखे (स्थापत्य), कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी, प्रवीण चकोले, जगदीश बोडखे, विनय काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांनी केले.
......................................
शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धा
कल्याण (वार्ताहर) ः मुंबई विभागीय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर आणि तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत मुंबई विभागातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, पालघर आणि मुंबई येथील तब्बल ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विजेते खेळाडू पुढील शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेत ईएसएस यंत्रणेचा वापर करून सर्व सामने पार पडले, जे अभिमानास्पद आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सचिव गफ्फार पठाण, खजिनदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात सहकार्य केले. आयोजन ज्योती हंकारे-पगारे, सुरेश अवाड, अजय गायकवाड, आशीष गुप्ता आणि बिनू अब्राहम यांनी केले.
..............................................
शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे
कल्याण (वार्ताहर) ः महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत पाणी शिरल्याने शेतजमीन, जनावरे आणि घरांचे नुकसान झाले आहे. या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत मदतीसाठी कल्याणकरांनी पुढाकार घेतला आहे. कल्याण पश्चिमेतील सामाजिक संस्था, उद्योगपती व मान्यवरांनी मिळून तब्बल १७ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. यात बांधकाम व्यावसायिक विकास वीरकर यांनी ११ लाख, गजानन महाराज मंदिर ट्रस्टने पाच लाख तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एक लाख रुपयांची मदत दिली. नरेंद्र पवार यांनी मदतीसाठी आवाहन केले होते, ज्याला कल्याणकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ही मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरेल.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.