विरार, ता. ९ (बातमीदार) ः वसई-विरार शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला आहे. महापालिकेने नागरिकांना दिलेल्या हजारो कचराकुंड्या देखभालीअभावी तुटल्या अवस्थेत आहेत, तर कचरा रस्त्यावर पडून रोगराई पसरत आहे. दुसरीकडे पालिकेने नवीन खरेदी केलेल्या कुंड्या नागरिकांना वाटप करण्याऐवजी विरारच्या फूलपाडा येथे धूळखात पडल्या आहेत.
वसई-विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होत असून नव्याने अनेक इमारती उभारण्यात येत आहेत. परिणामी, कचराकुंड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही वर्षांत पालिकेने ३० हजारांहून अधिक कचराकुंड्यांची खरेदी केली होती. शहरातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि स्वच्छता कायम राहावी, यासाठी महापालिकेने परिसरात निळ्या व हिरव्या रंगाच्या कुंड्या ठिकठिकाणी ठेवल्या होत्या. सोसायट्यांनासुद्धा त्याचे वाटप करण्यात आले होते; मात्र नव्याने खरेदी केलेल्या कुंड्या वापरात नाहीत. पालिकेने या कचराकुंड्यांचे लवकरच वाटप केले जाईल, असे सांगितले.
कचराकुंड्या तुटलेल्या, कचरा रस्त्यावर
रस्त्यावर स्वच्छतेसाठी असलेल्या कुंड्यांची योग्य निगा न राखल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. यातील काही कुंड्या झिजल्या आणि खराब होऊन मोडकळीस आल्या होत्या. त्या जागोजागी तुटल्या आहेत. या कुंड्यांमध्ये कचरा टाकला असता तो रस्त्यावर पसरत आहे. काही भागांतील कुंड्याच गायब झाल्या आहेत. कचरा टाकण्यासाठी कुंड्या नसल्याने हा कचरा एका जागी जमा करून ठेवावा लागत आहे. फुटलेल्या कुंड्यांतून कचरा बाहेर पडून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरू लागले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यात खाद्यपदार्थ व शिळे अन्न शोधण्यासाठी श्वान या कचऱ्याच्या पिशव्या आजूबाजूच्या परिसरात पसरवतात. त्यामुळे आजूबाजूला खेळणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण कसे होणार?
वसई-विरार महापालिकेने ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे; मात्र जर कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, तर नागरिक कचरा वेगळा करण्यास सक्षम कसे होतील, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांकडून शहरात पुरेशा कचराकुंड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
खराब होण्याची शक्यता
महापालिकेने खरेदी केलेल्या हिरव्या आणि निळ्या रंगाच्या नवीन कुंड्या वापरात आणण्याऐवजी त्या विरार पूर्वेच्या फूलपाडा येथील धरणाजवळ ठेवण्यात आल्या आहेत. जवळपास एक हजाराहून अधिक कुंड्या तशाच पडून असल्याने त्या वापराविना खराब होण्याची शक्यता आहे. शहरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने कुंड्यांचे वितरण करण्याची मागणी करण्यात होत आहे.
वसई-विरारमधील अनेक सोसायट्यांमध्ये कचराकुंड्या तुटल्या असून मुसळधार पावसामुळे काही डबे वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने तातडीने नवीन कचराकुंड्या उपलब्ध करून द्याव्यात.
- धनंजय गावडे, अध्यक्ष, स्वराज अभियान
कचराकुंड्या वाटपासाठी फूलपाडा येथे आणून ठेवल्या आहेत. आतापर्यंत दीड हजार कुंड्यांचे वाटप झाले आहे. आम्ही प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांकडून सोसायट्यांची माहिती मागवली आहे. ज्यांना या कचराकुंड्यांची आवश्यकता आहे आणि ज्यांनी मालमत्ता कर भरला आहे, अशा सोसायट्यांना त्या वितरित केल्या जातील.
- अर्चना दिवे, उपायुक्त (घनकचरा), वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.