महागाईतही शिवसेनेचा स्वस्तात दिवाळी फराळ
अर्ध्या किमतीत उपलब्ध करणार; तयार कपडेही स्वस्तात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः महागाई गगनाला भिडल्याने साखर, तेल, रवा, बेसन, चिवडा अशा सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करणे, फराळ तयार करणे सर्वसामान्यांसाठी खर्चिक ठरत आहे. त्याची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिवाळी फराळ स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी परळच्या कामगार मैदानानजीक भव्य स्टाॅल थाटला आहे. येथे चकली, करंजी, लाडू, चिवडा अशा सर्वच वस्तू अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिल्या जात असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे.
दिवाळी फराळाच्या प्रतिकिलोच्या किमती सर्वसाधारण दुकानात चारशे-पाचशे रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे दिवाळीची खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घेताना दिसतात. त्याची दखल घेत शिवसाना ठाकरे गटाच्या शाखा क्र. १९२चे शाखा समन्वयक रविकांत पडयाची यांनी तयार फराळाचा स्टाॅल उभारला आहे. येथे चकली, करंजी, नानकटाई, चिवडा, तिखट शेव, कडक बुंदीचे लाडू असे नानाविध पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर त्यांनी हा स्टाॅल सुरू केला आहे. त्यामुळे बाजारातील फराळाच्या तुलनेत अर्ध्या किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात असल्याचे पडयाची यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेकडून हा स्टाॅल लावला जात असून दरवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून विभागात गरजूंना साखर, रवा, तेल, बेसन अशा वस्तूंचे स्वस्तात वाटप केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाचशे रुपयांमध्ये कुर्ता-पायजमाही उपलब्ध
शिवसेनेने तयार फराळाबरोबरच कुर्ता आणि पायजमा अवघ्या पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची बाराशे-दीड हजार रुपये एवढी मोठी बचत होत आहे.
दिवाळीनिमित्त आम्ही दरवर्षी सर्वसामान्यांना अर्ध्या किमतीत तयार फराळ उपलब्ध करून देतो. त्यामध्ये कोणताही नफा मिळवण्याचा हेतू नसल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- रविकांत पडयाची, स्टॉलचालक
दादरसारख्या महागड्या ठिकाणी जाऊन फराळ खरेदी करणे खिशाला परवडत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून अर्ध्या किमतीत फराळ मिळत असल्याने मोठी बचत होत असून ते पैसे इतर ठिकाणी उपयोगाला येत आहेत.
- शाम शिरोडकर, ग्राहक
दिवाळीत नेहमीच महागाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिवसेनेकडून अल्प दरात साखर, रवा, तेल वाटप केले जात असून आता तयार फराळही अर्ध्या किमतीत मिळत असल्याने खिशावरील भार हलका होत आहे.
- विनायक पाटोळे, ग्राहक
फराळाचा दर (प्रतिकिलो)
- चकली - २०० रुपये
- नानकटाई - २०० रुपये
- करंजी - २०० रुपये
- चिवडा - १५०-२०० रुपये
- तिखट शेव - २१० रुपये
- शंकरपाळी - २०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.