दिवाळीसाठी रंगीत पणत्यांची चलती
३० ते ५० रुपयांपर्यंत विक्री; परराज्यातील विक्रेते दाखल
पोलादपूर, ता. १२ (बातमीदार) : पोलादपूरसह ग्रामीण भागात अनेक महिला, शालेय विद्यार्थी आणि तरुण मंडळी छंद म्हणून मातीच्या पणत्यांना विविध रंगछटा देत आकर्षक बनवून बाजारात विक्रीस आणत आहेत. गेल्या काही वर्षांत रंगीत पणत्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला असून, चार पणत्यांचा सेट ३० ते ५० रुपयांपर्यंत, तर साधी पणती दोन ते सात रुपये दराने विकली जात आहे. सिंगल रंगीत पणतीचा दर १० ते १५ रुपये असून, बाजारपेठेत यंदा आकर्षक डिझाइनच्या पणत्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत.
या वर्षी निवडणुकांचा काळ सणासुदीच्या दिवसांशी जुळून आल्याने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लहान मातीची मडकी, पानाच्या आकाराच्या पणत्या, चौकोनी स्वस्तिक पणत्या तसेच विशेष रंगकाम केलेल्या दिव्यांना मोठी मागणी दिसून येत आहे. मुंबई, पुणे, कराड, शिरवळ अशा ठिकाणांहून विक्रेते स्थानिक बाजारात येऊन विक्री करीत आहेत. कुंभारांकडून मिळालेल्या पणत्या रंगवून विक्रीसाठी सज्ज केल्या जात आहेत. पणत्यांना प्लॅस्टिकचा रंग देण्यात येत असल्याने त्यातून तेल बाहेर झिरपत नाही. त्यामुळे दिवा अधिक काळ तेवत राहतो, असे विक्रेते सांगतात. रंगकाम करण्यासाठी फॅब्रिक किंवा कॅमलिन फॅबरेलिक कलर्सचा वापर केला जातो. पणत्या रंगविण्यापूर्वी त्या काही तास पाण्यात भिजवून नंतर वाळवाव्या लागतात. आतल्या बाजूला लाल, बाहेर नारिंगी अशी रंगसंगती आकर्षक दिसते, अशी टिप्स अनुभवी रंगकर्मी देतात. फक्त पणत्याच नव्हे, तर बांबूचे आणि कागदी आकाशकंदीलही घरच्या घरी तयार करून विक्रीस आणले जात आहेत. जिलेटीन पेपर आणि बांबूच्या कामट्यांपासून तयार केलेले हे कंदील बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत. आजच्या युगात मातीचा सुगंध, हाताने केलेले रंगकाम आणि प्रकाशाचा सण एकत्र येऊन कोकणातील दिवाळीला पुन्हा त्या पारंपरिक आणि कलात्मक तेजाने उजळवून टाकत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.