क्लस्टरला हाणामारीचे गालबोट
वाद पोहोचला पोलिस ठाण्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प क्लस्टर डेव्हलपमेंटला ठिकठिकाणी विरोध वाढू लागला आहे. मात्र या विरोधाचे रूपांतर आता हाणामारीत होऊ लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसंत विहार येथील जवाहरनगर या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत असलेल्या मतभेदातून दोन गट एकमेकांशी भिडले. यातून पिता-पुत्राला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. क्लस्टरला हाणामारीचे गालबोट लागल्यामुळे प्रकल्प पुन्हा एकदा वादात सपाडला आहे.
आशिया खंडातील आणि देशातील सर्वात मोठा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प ठाण्यात आकाराला येत आहे. अनधिकृत धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या ठाणेकरांना हक्काचे घर देणारा हा प्रकल्प असून, त्यामुळे शहराचा कायापालट होणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या हा प्रकल्प किसननगर येथे सुरू असून, शहरातील इतर भागांमध्येही तो सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र हा प्रकल्प राबवत असताना पुर्निर्माणधीन असलेल्या इमारतींवर सक्ती केली जात असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. तसेच एसआरए प्रकल्पाला बगल देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे क्लस्टरबाबत ठाणेकरांमध्ये संभ्रम वाढत असून, त्याला आता विरोध वाढत चालला आहे.
वसंत विहार येथेही क्लस्टरवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटकरिता जवाहरनगर येथील काही रहिवासी व आनंद बाजार सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये मतभेद आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (ता. १०) निखिल डेव्हलपर्स यांच्या जागेवर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला १०० जण उपस्थित होते. निखिल डेव्हलपर्सचे प्रतिनिधी म्हणून विजय देशमुख आले होते. याचदरम्यान जवाहरनगर येथील रहिवासी निखिल यादव तेथे आले आणि त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आधी शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर सभासदांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही निखिल यादव ऐकत नसल्याचे पाहून अखेर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर पुन्हा बैठक झाली; पण बैठक संपल्यानंतर निखिल यादव याने मित्रांच्या मदतीने तक्रारदारांना बेदम मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तक्रारदार पितापुत्राला बेदम मारहाण
दिव्यांग दुस्मान (२४) यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांचे वडील भिकाजी (५६) हे जवाहरनगर परिसरातील आनंद बाजार सहकारी गृहनिर्माण या संस्थेचे अध्यक्ष आहेत. बैठकीत निखिल यादव याने हुज्जत घातल्यानंतर त्याच्या मित्रांनी सायंकाळी तक्रारदार, त्यांचे वडील आणि सात सभासदांना रस्त्यात गाठत पुन्हा मारहाण केली. त्यामधील रौनक यादव याच्या हल्ल्यात दिव्यांग यांच्या हाताला आणि डोळ्यावर मुका मार लागला. सदस्य रमेश खामकर व निखिल डेव्हलपरचे प्रतिनिधी विजय देशमुख यांनादेखील जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.