ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील गायमुख घाटमाथ्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रविवारी (ता. १२) नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. या कामाकरिता वाहतूक विभागाने शनिवारी (ता. ११) रात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे; मात्र पालघर, चिंचोटी आणि कापूरबावडी नाक्यावर या आदेशाचे पालन केले गेले नाही. न्हावा-शेवा बंदर आणि पालघर, वसई, गुजरातकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्याने प्रचंड कोंडी झाली. त्यातच रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे-घोडबंदर वाहिनीवर उलटल्याने कोंडीमध्ये आणखी भर पडली. परिणामी, रविवार सुट्टीचा दिवस घोडबंदरकरांना प्रचंड त्रास देणारा ठरला.
घोडबंदर घाट परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हे काम महिन्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मिरा-भाईंदर महापालिका हे काम करणार होती; मात्र त्यामध्ये विलंब झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. आता पालिकेने हे काम हाती घेतले असून त्याकरिता मिरा-भाईंदर आणि ठाणे वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियोजन करणारे परिपत्रक काढण्यात आले आहे. घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना शनिवारी (ता. ११) रात्री १० वाजल्यापासून मंगळवारी (ता. १४) रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीला बंदी घालण्यात आली; मात्र ही बंदी घातलेली असतानाही कापूरबावडी वाहतूक विभाग, चारोटी, पालघर वाहतूक विभागाकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली. परिणामी, या मार्गावर वाहतुकीला बंदी असतानाही दोन्ही नाक्यांवरून अवजड वाहनांना अडवण्यात आले नाही. त्यामुळे रात्रभर या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिली. केवळ एवढेच नव्हे, तर रविवारी दुपारपर्यंतही या वाहनांना वाहतूक विभागाकडून अडवण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेकडून रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही वाहिन्यांवर वाहनांची वाहतूक सुरू होती. यामुळे इतर लहान आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कोंडीत अडकावे लागले.
रोटेशन पद्धतीचा वापर
मिरा-भाईंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या रस्त्यावर दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक २० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूकडील वाहने रोटेशन पद्धतीने सोडली जात होती. गायमुख घाट चढणीला मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने घाटावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
२० मिनिटांचा प्रवास चार तासांवर
पालघर आणि चिंचोटी नाक्यावर गुजरात, वसईकडून येणारी जड-अवजड वाहने अडवले नसल्याने ही वाहने ठाणे घोडबंदर मार्गावर बंदी असतानाही दिसत होती. ठाण्याहून वर्सोवा नाका येथे वाहनाने जाण्याकरिता १५-२० मिनिटे लागत असताना या कोंडीमुळे तब्बल तीन ते चार तासांचा अवधी लागत होता.
अपघातामुळे कोंडीमध्ये भर
घोडबंदर मार्गावरील हनुमान मंदिर परिसर आणि मुंबई-नाशिक महामार्गावर आरडी ढाबा परिसरात ट्रक उलटून अपघात झाले. दोन्ही ठिकाणी उलटलेले ट्रक बाजूला काढण्यास वेळ लागल्याने कोंडीत भर पडली होती.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी त्यांना एकदम बंदी घातली तर आणखी मोठी समस्या उभी राहू शकते. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येत आहे. थोड्या थोड्या अंतराने अवजड वाहनांनाही प्रवेश दिला जातो; मात्र सायंकाळी पाच वाजल्यानंतर खानिवडे नाका येथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक संघटना, पालघर पोलिस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
- अशोक विरकर, उपायुक्त,
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.