किन्हवली, ता. १२ (बातमीदार) : किन्हवली येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे सध्या अपघातांना आमंत्रण देत आहे. बाजार समितीने उपबाजाराच्या आवारात दुकानदारांसाठी भाडेतत्त्वावर कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध न केल्याने, विक्रेत्यांना शहापूर-किन्हवली-मुरबाड या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दुकाने थाटावी लागत आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून, अवजड वाहनांना जागा देताना अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
किन्हवली येथे दर रविवारच्या आठवडा बाजारात शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात विविध प्रकारची दुकाने लावली जातात. जुन्नर, आळेफाटा, बनकर फाटा, ओतूर, नाशिक आदी ठिकाणचे भाजीपाला, सुकी मासळी, कडधान्य, गृहोपयोगी, कपड्याचे व्यापारी या बाजारात दुकाने थाटतात. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांकडून ताजी पण स्वस्त दराने भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक एकच गर्दी करतात. अनेकदा वाहनचालक, दुकानदार व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत असते.
काही दुकानदार रस्त्याच्या अगदी कडेलाच दुकाने मांडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शहापूर-किन्हवली-मुरबाड या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक अहोरात्र सुरू असते. अनेकदा समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना टायर घसरून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रविवार हा सुट्टीचा वार असल्याने आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच मोठी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा फटका बसतो.
व्यापारी वर्गात नाराजी
१५ वर्षांपासून हा आठवडी बाजार भरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर गाळे किंवा पर्यायी तत्सम उपाययोजना करून न दिल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. अनेकांना भाजीपाला आणि अन्य जिन्नस खराब होऊ नयेत, म्हणून प्लॅस्टिक ताडपत्रीचे छप्पर करावे लागते. दुकानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत किन्हवली ग्रामपंचायतीने वारंवार कळवूनही बाजार समिती दुर्लक्ष करत आहे.
दगडी जोत्यावर तात्पुरत्या व्यवस्थेची मागणी
काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळे तयार करण्यासाठी बांधलेले दगडी जोत्याचे बांधकाम तसेच पडून आहे. त्या जागेवर साफसफाई करून विक्रेत्यांना तात्पुरती बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिल्यास संस्थेच्या आर्थिक उत्पनांतही भर पडणार आहे.
-----
आठवडी बाजारात दुकाने मांडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच व्यापारी गाळे बांधणार आहेत. आता पावसाने उघडीप दिल्याने काही दिवसांत उपबाजार आवारात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
- महेश पतंगराव, संचालक,
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
किन्हवली : येथील आठवडी बाजारात झालेली वाहतूक कोंडी.
२)महेश पतंगराव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.