डोंबिवलीत अनोख्या पद्धतीने सर्पदंश जनजागृती
रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्पमित्रांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः सर्पदंशामुळे डोंबिवलीतील एका मुलीसह तिच्या मावशीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा घटना घडू नयेत, तसेच घडल्यास नेमके काय करायला हवे, याचे ज्ञान सर्वांना मिळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने तत्काळ सर्पदंश जनजागृती करण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (ता. ११) डोंबिवली पूर्वेकडील रोटरी क्लबच्या गार्डनमध्ये करण्यात आली.
रविवारी (ता. २८ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास डोंबिवलीजवळच्या खंबाळपाड्यातील ठाकूर कुटुंबीयांकडे पाहुणी म्हणून मुक्कामी थांबलेल्या चारवर्षीय प्राणवी भोईर आणि तिची २३ वर्षीय मावशी श्रुती ठाकूर या दोघींना गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला आणि टप्प्याटप्प्याने या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर सापांविषयी जनमानसांत भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, साप हा निसर्गाचा अविभाज्य घटक असल्याने त्याचेही जतन व्हायला हवे. यासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि सर्पमित्रांनी सर्वसामान्य नागरिकांना सापांबद्दल आवश्यक माहिती मिळायला हवी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीत सर्पाविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रोटरीयन विजय घोडेकर व स्थानिक सर्पमित्र ऋषी सुरवसे यांच्या मदतीने आपल्या परिसरात आढळणाऱ्या अविषारी, अर्धविषारी आणि विषारी सापांविषयी आवश्यक असे रंगीत माहितीपत्रक तयार केले. मुलांना व सामान्य माणसाला तो पटकन ओळखता यावा, यासाठी विविध प्रकारचे साप, त्यांचे फोटो व त्यांची वैशिष्ट्ये यांचा अंतर्भाव केला. त्याचबरोबर डोंबिवलीतील काही सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार व सर्पदंशांवरील उपचारांसाठी इमर्जन्सी संपर्क क्रमांक, अशी सर्व माहिती असलेले फलक रोटरी गार्डनच्या प्रवेशद्वारावर आकर्षक आणि स्पष्टपणे लावण्यात आले. जेणेकरून ही सर्व माहिती नागरिकांच्या सहज नजरेस पडेल.
डिजिटल माध्यमातून प्रसार
आपण राहतो त्या परिसरात कधीकधी सापांचे दर्शन घडत असल्याने हा उपक्रम नागरिकांना अशाप्रसंगी शांत, सजग आणि तयार राहण्यास मदत करेल. या माहितीची डिजिटल आवृत्तीदेखील तयार करण्यात आली असून, ती मोबाईल आणि समाजमाध्यमातून व्यापकपणे प्रसारित करण्यात येणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी सांगितले. तर हा लहान पण अर्थपूर्ण उपक्रम समाजात जागृती निर्माण करून, घबराटीऐवजी योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या कृतीद्वारे जीव वाचविण्यास मदत करेल, असा विश्वास मानद सचिव विनायक आगटे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.